बघुनि ती कुलक्षण कुब्जा ॥
भाळला कसा वनमाळी ॥
तुम्हि अमुचा निरोप कळवा ॥
उद्धवजी हरिस तात्काळी ॥धृ०॥
एक गोपि म्हणे किति गोरी ॥
उद्धवजि कोळशावाणी ॥
मळ सर्वांगावरि बसला जणु दुर्गंधीची खाणी ॥
ते दंत किती तरि पिवळे ॥
येतसे मुखातुन घाणी ॥
नसे धडके चोळी-लुगडे ॥
दिल्या गाठि ठिकठिकाणी॥
शिरि जटाभार केसांचा ॥
कोण देत तेल त्या पाणी ॥
हरि भुलला मस्तकि परि ती ॥
वृश्चिक-पुच्छ-सम वेणी ॥
डोयि उवा खंडिभरि भरल्या ॥
करकरा करे खाजोळी ॥तुम्हि अमुचा०॥१॥
म्हणे दुसरि नयन किति पिचके ॥
ते बसके नासिक कोणी ॥
बनविले न कळे हरि अम्हा ॥
का बघुन केलि त्वा शहाणी ॥
जरि कूळ म्हणावे खास तरि दासि कंसरायांनी ॥
ठेविली प्रतिदिनी त्याते, देतसे गंध आणोनी ॥
परतविल्या किति नृपकन्या, आवडलि त्यात ही राणी ॥
बाइ मजला खचिताचि कळले केले चेटुक त्या सटवीनी ॥
तिशि बघुन मनी मज वाटे, कुणि उचलुनि द्यावी सूळी ॥तुम्हि अमुचा०॥२॥
दिन होउनि सकल व्रजललना, नानापरि बोलति त्यासी ॥
तुज कैसी नाही ममता, रे कृष्णा मथुरावासी ॥
तुजवीण नारि अह्मि वेड्या, नाहि सुचत सदनि कार्यासी ॥
मनि वाटे विष तरि खावे, अर्पावे प्राण यमुनेसी ॥
ओसाड तुजविणे जग ते, भासते अम्हा नयनांसी ॥
मनमोहना का नच करुणा, येइना अशा समयासी ॥
कुब्जातः सुखदा, कृष्णा श्रीरंगा-पदा धरि भाळी ॥तुम्हि अमुचा०॥३॥