औट हाती दश द्वारांच्या आत्मा या गृहि मालक साचा ॥धृ०॥
स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हेचि चौ चौक पहा ॥
बहात्तर कोणी रेजा अर्ध्या चंद्राच्या चांदणि राहा ॥
साहि शास्त्रे धुंडुनी पहा ॥
गुरु-शिष्यांचा संवाद महा ॥औ०॥१॥
परा पश्यन्ती मध्यम वैखरी ॥
गायन करिती चौघी नारी ॥
परात्पर पलंगावरी ॥
पुरुष-प्रकृति निद्रा करी ॥
मनोराया तिथे कारभारी ॥
चंचल चपलत्वे सेवा करी ॥औ०॥२॥
हे घर पडता जाईल घडी ॥
षड्रिउ तस्कर झडकरी काढी ॥
नेत्रकमळी विषयाते झाडी ॥
हे करकमळ स्व-स्वरूपा जोडी ॥औ०॥३॥
ऐसा योग साधेल ज्याला ॥
आत्मा सद्गुरु मन शिष्य झाला ॥
गुरुराये उपदेश केला ॥
तो म्हणे कृष्णा चित्ती म्या धरिला ॥औ०॥४॥