सांग कुठे प्राणपती मजसि मुद्रिके ॥मजसि०॥
कशि आलिस सागर हा तरुन प्रियसखे ॥सांग०॥धृ०॥
कांचनमृग पाहुनिया झालि वसना ॥झालि०॥
मम अंतरि कंचुकिची कमललोचना ॥कमल०॥
प्रार्थियले बघुन शीघ्र हरिण हा आणा ॥हरि०॥
चापबाण घेउनि करी जाति कौतुके ॥सांग०॥१॥
पापिणिने राघवास धाडिले वनी ॥धाडिले०॥
धाव धाव लक्ष्मणा उमटला ध्वनी ॥उम०॥
घाबरुनी भाउजिंची करित विनवणी ॥ करित०॥
साह्य राघवास करा जाउनी निके ॥सांग०॥२॥
या वनात प्राणनाथ पडुन संकटी ॥पडुन०॥
बाहताति करुण स्वरे जोडि करपुटी ॥जोडि०॥
जाई शीघ्र आश्रमात वसेन एकटी ॥वसे०॥
वचन असे परिसुनिया शेषनायके ॥सांग०॥३॥
हे वहिनी विपरित तू बोलसी कसे ॥बोलसी०॥
त्रिभुवनात राघवास अभय ते असे ॥अभय०॥
त्यासमान या जगात वीर कुणि नसे ॥वीर०॥
सोडू नको धैर्य अता जनक-कन्यके ॥सांग०॥४॥
चल दुष्टा धरुन वदसि पापवासना ॥पाप०॥
अंतरता राम-प्राण त्यजिन या वना ॥त्यजि०॥
कल्पांती प्राप्त नव्हे रामअंगना ॥राम०॥
सौमित्रे कर कर्णी धरुनि नायके ॥सांग०॥५॥
आणि अश्रु नयनि ओढि बाण रेष तो ॥बाण०॥
जाउ नको उल्लंघुनि वदन शेष तो ॥वद०॥
शोधिन मी कांतारी राघवेश तो ॥राघ०॥
त्या मागे नेलि मला येउनि दशमुखे ॥सांग०॥६॥
होउन पुढे वायुतनय नमित जानकी ॥नमि०॥
पैलतिरी राम उभा धरुन बाण की ॥धरु०॥
वधिल दुष्ट करिल बंधमुक्त हो सुखी ॥मुक्त०॥
म्हणे कृष्णा दिधले अभय पवनबालके ॥सांग०॥७॥