जातो मथुरेला हरि हा टाकुनि आम्हाला ॥
नंद यशोदेला हरी०॥धृ०॥
गडे नंदाच्या द्वारी जुंपुनि रथ सिद्धचि झाला ॥
दधि करकमळी घालुनि माता बोळविते त्याला ॥
चलागे अडवू कृष्णाला ॥जातो०॥१॥
नंद यशोदा अकांत करिती मारुन मिठि हरिला ॥
नेत्री अंजन घालुनि लावित गालबोट गाला ॥चला०॥जातो०॥२॥
घातकि अमुचा मथुराधिपती नेतो या बाला ॥
काठि, कांबळा, घुंगुर, वाहणा हरि त्यागुन गेला ॥चला०॥जातो०॥३॥
कासे पितांबर मुगुट कुंडले कौस्तुभ वनमाला ॥
करि कर धरूनी रथि बैसवितो अक्रुर हा मेला ॥चला०॥जातो०॥४॥
व्रजांगना त्या नंदअंगणी अडविति कृष्णाला ॥
मम ह्रदयांतरि बैसे क्षणतरि नमि कृष्णा हरिला ॥चला०॥जातो०॥५॥