गौरि म्हणे शंकरा चला हो खेळु आपण या स्थळी ॥
खेळु आपण० ॥
म्या सारीपाट मांडिला तळी ॥
ब्रह्मपुत्र पातले सहज ते करि वीणाचिपळी, करि० ॥
गातसे शंकर नामावळी ॥
परस्परे खेळता मुनीने लावुन दिधली कळी, ला० ॥
जाहली उभयतात दुफळी ॥
ह्या खेळासी रंग न ये हो पण केल्या वाचुनी, पण० ॥
घ्या तुम्ही एकमेका जिंकुनी ॥
भोळा त्रिंबक कपट बळाने आणिला त्वा जिंकुनी, अणि० ॥
धन्य तू कुशल उमे कामिनी ॥ धृ०॥१॥
प्रथम डावि जिंकिले शिवाचे आसन व्याघ्रांबर, आ० ॥
द्वितीया घेत शशी सुंदर ॥
कंथा झोळी त्रिशूळ डमरू हरि गिरिजा चतुर ॥हरि०॥
द्या म्हणे रुंड माळ सत्वर ॥
एकीमागे एक हिरोनी म्हणे गिरिजाप्रियकर, म्ह० ॥
हरिन मी नंदी गंगाधर ॥
नाचत नाचत वाजवि चिपळ्या करि धरुनी उदर, क० ॥
गदगदा हासतसे मुनिवर ॥
गौरिमुळे तुज वैभव देवा नच पुसते रे कुणी, न० ॥
पशु-पती जात वना रुसुनी ॥भोळा०॥२॥
सर्व संग सोडुनी शिवाने ध्यानि अणुनिया हरी, घ्या०॥
हिमालयि गंगाधर तप करी ॥
नाथाकारण शैल-कंदरी शोधि वने वनचरी, ॥शो०॥
पाहिला अकस्मात माहेरी ॥
लाल पैठणी नेसुन ल्याली कंचुकी मग भरजरी, कं० ॥
भूषवी तनूते नानापरी ॥
काजळ कुंकू हळद लावुनी चंदन उटि केशरी, चं० ॥
सुवासे वसंत खेपा करी ॥
पायि पैंजण घालुनि नाचत नाचत ये त्या वनी ॥ना०॥
उघडिले नेत्र शिवे त्या क्षणी ॥भो०॥३॥
नृत्यकला बघावया पातले स्वर्गीचे सुरवर, स्व० ॥
जाहला शिव तो कामातुर ॥
ध्यान विसरुनी पुढे येवुनि पुसे तिजला शंकर, पु० ॥
कोण तू सांग मला सत्वर ॥
स्वर्ग-मृत्यु-पातळि अशी मी नाहि देखिली नार, ना०॥
अससि तू गिरिजेहुनि सुंदर ॥
कामशराने व्याकुळ झाला धरी तिचा पदर, ध० ॥
तामशा झोंबु नको चल सर ॥
झिडकारूनी देत शिवाला बोले उमा दुरुनी, बो० ॥
उग्र पति शापिल मज पाहुनी ॥ भो०॥४॥
भूत पिशांचामधे हिंडिशी मम अंगी भय भरे, म० ॥
कोण तू सत्वर मज सांगरे व दाढिशिखा तव शुभ्र जाहली सर्व तरुणता सरे, स० ॥
शोभेना ऐसा मज कांत रे ॥
तू तर तामसि मी तरि आहे चंद्रकला शांत रे ॥चं०॥
जमेना तुज मज एकांत रे ॥
कोठे हरवली प्राणप्रिया त्वा सांग मला या क्षणी, सां० ॥
का तिने दिधले तुज टाकुनी ॥ भो०॥५॥
कैलासी मी राहे निरंतर श्रेष्ठ सर्व सुरगणी, श्रे०॥
एकदा हैमवती घेउनी ॥
द्यूत खेळता हिरुन घेतले सरहि मजपासुनी, सर्व०॥
दिगंबर केले मज त्या क्षणी ॥
वदन तिचे मज नको पहावया दुष्ट ति दाक्षायणी, दु० ॥
मजला ठाउक मुळपासुनी ॥
तुजविण माझा जीव घाबरा जाउ नको भिल्लिणी, जा० ॥
आलिंगन देइ मला या वनी ॥ भो०॥६॥
तुजसि वरूनी समुळ बुडाली खचितचि नगकन्यका, खचि० ॥
धरिलि तू गंगा निज मस्तका ॥
नाहिं तुझेरे प्रेम तिजवरी राम करिसि तू सखा, रा० ॥
भोळि रे भोळि खरी अंबिका ॥
ती तरुणी तू पुरातनीचा वृद्धचि मदनांतका, वृ०॥
राहिली भाव धरुनिया निका ॥
मजसम असती जरि कामिन ती ठकविति तुजला ठका, ठ० ॥
लाविती चुना तुझ्या नासिका ॥
हासत नाचत भिल्लिण मुरडी नेत्र नाक त्या क्षणी, ने० ॥
जातसे शंकर तिज-मागुनी ॥भो०॥७॥
पुढे पार्वती मागे शंकर जात तिचा कर धरून, जा० ॥
आणिला कैलासा-प्रति फिरून ॥
बैसवुनी आसनी पूजिला घालुनि माळा वरून, घा० ॥
हासते आलिंगन करकरून ॥
गौरिशंकरा देइ सन्मती या भवतापा हरून, या० ॥
गाइन मी शिवलीला रस भरून ॥
धन्य माउली उदर-कमळ ते नउ महिने राहुनी, न० ॥
हो म्हणे सार्थक कृष्णा झणी ॥भो०॥८॥