कृष्णरावाची खालि समाधी ॥
वरि श्री दत्तमूर्ति स्थापिली ॥धृ०॥
संस्थान हे अकुळणेर गाव ॥
जहागिर भोक्ते कृष्णराव ॥
मोरेश्वर गणपति चिरंजिव ॥
चतुर्थाश्रम धरिती,अति ते ॥कृष्ण०॥१॥
शक अठराशे नऊ या साली ॥
अत्रिसुताची अर्चा झाली ॥
मोरोपंते ख्याती केली ॥
पसरलिसे कीर्ती, दिगंतरी ॥कृष्ण० ॥२॥
मार्गशीर्षपौर्णिमे उत्सव ॥
दत्तजन्म होतसे अपूर्व ॥
वाद्यगजर होत अभिनव ॥
कथाकीर्तन करिती, रजनिसी ॥ कृष्ण० ॥३॥
श्वानरूपी चहुवेदही असती ॥
सवत्स धेनू सन्निध बसती ॥
शुभ्रकांतिची पडली दीप्ती ॥
शिरि गंगा धरि-ती, चंद्रासह ॥कृष्ण०॥४॥
पायि पादुका वरति साखळ्या ॥
भगवे वसन वरि कटी मेखला ॥
रुद्राक्षांच्या शोभति माळा ॥
करि अयुधे घेती, दंडासह ॥कृष्ण०॥५॥
अत्रिनंदना मागत बरवे ॥
मम मातुलगृहि दुःख नसावे ॥
मम मानसि गुरु सतत वसावे ॥
देइ सदा सुमती, यतिवरा ॥कृष्ण०॥६॥
बुडत चालले ह्या भवडोही ॥
दीनदयाघन तारू होई ॥
पैलतिराते सत्वर नेई ॥
करि कृष्णा विनती, प्रभूपदी ॥कृष्ण०॥८॥