हो रात्री कोठे होता चक्रपाणी हो ॥
खरेच सांगा पुसते राधा अनयाराणी हो ॥धृ०॥
हो पाहिली मी वाट चारी प्रहरी हो ॥
आता येतील मग म्हणते शौरी हो ॥
हात-तुरे गजरे करि तयारी हो ॥
नाही अपुला ठिकाण कोठे होती स्वारी ॥हो रात्री०॥१॥
गे नाही कोठे गेलो सत्य राधे ग ॥
ढवळी धेनु चुकली तीच्या छंदे ग ॥
रात्र फार झाली वेणू-नादे ग ॥
भक्षीले मी जांभुळ झालो व्याकुळ क्षूधे ॥हो रात्री०॥२॥
हो माळी फार तुमच्या घाम आला हो ॥
भिजुनी शेला सारा चिंब झाला हो ॥
सुकले तोंड लागे पिवळे गाला हो ॥
नेत्र लाल म्हणते राधा सत्य बोला ॥हो रात्री०॥२॥
ग तुजवरि राधे माझा प्रेमा सारा ॥
मार्गी येता आल्या मेघ धारा ग॥
कडकडोनी वीजा सुटला वारा ग ॥
जाईखाली बसता भिजला शेला साराग ॥हो रात्री०॥४॥
हो मजसी दावा तुमच्या भोगांगना हो ॥
माझा तांबुल तुम्ही प्रेमे घ्यावा हो ॥
मजसी प्रेमभावे का बोलाना हो ॥
सद्गद कंठा राधा झाली बघुनी कृष्णा हो ॥हो रात्री०॥५॥
हो कळवळोनी कृष्णे धरिली हाती हो ॥
सत्य सत्य राधे तुजवरी प्रीती हो ॥
आलिंगूनि राधा अंकी घेती हो ॥
झाली कृष्णा राधा-कृष्णागुण गाती हो ॥ हो रात्री०॥६॥