मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
गौरीनंदना विघ्ननाशना , नम...

मानसगीत सरोवर - गौरीनंदना विघ्ननाशना , नम...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


गौरीनंदना विघ्ननाशना, नमिते चरणाला ॥

नेइ माहेराला नेइ० ॥धृ०॥

आनंद पिता शांती माता, यांची मी बाला ॥

भाव बंधू भक्ती भगिनी ऐशी ही अबला ॥

मम इतिहासा ऐके आता सांगतसे तुजला ॥चाल॥

तारी दुहितेला, तारी कन्येला ॥

गौरिनंदना, विघ्ननाशना नमिते चरणाला ॥१॥

प्रपंच श्वशुर हा व्यर्थ गांजितो काय करू याला ॥

इकडुनि तिकडे घिरट्या घेता, जीव बहु दमला ॥

लक्ष चौर्‍याशी फेरे फिरुनी शिणभागचि झाला ॥चाल॥

रक्षी दीनाला ॥ रक्षी दासीला ॥गौरि०॥२॥

क्रोधदिराने अवघा बारे सत्यनाश केला ॥

मन्मथ माझ्या सर्वांगाशी झोंबू लागला ॥

अंधकार तो अज्ञानाचा हटवादी झाला ॥चाल॥

प्रगटवि तेजाला, दाखवि स्वरुपाला ॥गौ०॥३॥

किती कपटी ही दुष्टवासना नणंद हो झाली ॥

दुर्बुद्धि सासुला कशी ही शिकवू लागली ॥

मायलेकिंनी मिळुनी मजला भ्रांतिष्ट केली ॥चाल॥

जीव दमुनि गेला ॥ भ्रांतिष्ट झाला ॥गौरि०॥४॥

सोसेना मज जाचणूक ही शरण तुला आले ॥

सिंहासनि तव स्वरुप पाहुनी मन तल्लिन झाले ॥

मुगुट मस्तकी शूर्पकर्णी कुंडल धरियेले ॥चाल॥

दे तु ध्यानाला, ह्रदयी पान्ह्याला ॥गौरि० ॥५॥

सर्वांगा शेंदूर चर्चिला पीतांबर पिवळा ॥

कटी कसोनी गळा शोभती मौक्तिकमणिमाळा ॥

पाशांकुश करि चंद्रकोरसम चंदन भाळाला ॥चाल॥

मुषकावरि बसला, नेपुर पदकमला ॥गौरि० ॥६॥

माणिकमणिपरि नयन शोभती वक्रतुंड तुजला ॥

एकदंत लंबोदर म्हणती दाक्षायणी बाळा ॥

शमि दूर्वांकूर वाहती रक्तकुसुममाला ॥चाल॥

भक्षि मोदकाला, मी पयामृताला ॥गौरि०॥७॥

अष्टनायकासहित विनायक का मजवरि रुसला ॥

संकट माझे पाहुनि कैसे स्वस्थ तुम्ही बसला ॥

विघ्नहरा हे भक्त गर्जती पाळ बिद्रा आपुल्या ॥चाल॥

पाव पाव मजला, धावा मांडियला ॥गौरि०॥८॥

चपलेसम ती ब्रह्मकुमारी वामांकी बैसे ॥

मयुरवाहिनी देवि शारदा दक्षिणेस ऐसे ॥

ऋद्धी सिद्धी चामर धरिती गजवदनासरसे ॥चाल॥

पाहुनि स्वरुपाला ॥ लागे पदकमला ॥गौरि०॥९॥

रूप साजिरे ध्यान गोजिरे मन रमले पायी ॥

काया वाचा मने शरण तुज ही कृष्णाबाई ॥

बुडत असे मी भव डोही बा पैल तिरा नेई ॥

तारी दुहितेला, तारी कन्येला ॥गौरि०॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 29, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP