तुज अन्य मि मागत नाही ॥
गुरुमाय येवढे देई ॥धृ०॥
हा मायापुर आटावा ॥
भवबंधन रज्जु तुटावा ॥
मम त्रिविध ताप उठावा ॥
मदमत्सरमोह सुटावा ॥
हा अहंकार सुटावा ॥
षड्विकारकुंभ फुटावा ॥चाल॥
अज्ञान तिमिर झडू दे ॥
ज्ञानोदय ह्रदयि पडू दे ॥
सत्संग सतत घडू दे ॥
जळो मी-तुपणा लवलाही ॥तुज०॥१॥
मज गुरुचा बोध पटावा ॥
संशय हा समुळ फिटावा ॥
विषयांचा लोभ विटावा ॥
ज्ञानांकुर ह्रदयि फुटावा ॥
नवविधा भक्ति नटावा ॥
जिव परउपकारि झटावा ॥चाल॥
क्षयरोगकुष्ठ हरिलेसी ॥
वांझेला संतति देसी ॥
मृत सतिपतिला उठवीसी ॥
अशि अघटित तव नवलाई ॥तुज०॥२॥
तुम्हि अनुसयेचे पोटी ॥
अवतरला दीनासाठी ॥
किती दिवस अशी अटआटी ॥
सोसावी म्या जगजेठी ॥
धरि कवळुनि मजला पोटी ॥
का बघसी कौतुक दृष्टी ॥चाल॥
सुखदुःखा म्या विसरावे ॥
अद्वैत समुळ जिरावे ॥
तवरूपी चित्त मुरावे ॥
ही आस दुजी नच काही ॥तुज० ॥३॥
किति अंत बघसि त्रैमूर्ति ॥
पसरली जगी तव कीर्ति ॥
ऐकूनि विषयि जन येती ॥
व्हावया कामनापूर्ती ॥
तव ध्यानि पातके हरती ॥
किति पिशाच भूते तरती ॥चाल॥
यास्तव मम करुणा यावी ॥
वैकुंठी वस्ति करावी ॥
श्रीदत्तरूप तनु व्हावी ॥
हे मागत कृष्णाबाई ॥तुज०॥४॥