कोण श्रेष्ठ परीक्षू मनि म्हणती भृगुमुनी ॥
जाति कैलासासी शिव ते सिंहासनी ॥
धरि वामांकावरि, तुहिनाचलनंदिनी ॥
भृगु जाता तेथे झालि मानखंडणी ॥
हा तामसि याते ज्ञान नसे अंतरी ॥
का टाकुनि पतिला आलिस कोल्हापुरी ॥
दे दर्शन अंबे धाव पाव झडकरी ॥का०॥१॥
तो सृष्टीकर्ता रचनेमधे गुंगला ॥
कोण सदनी आला भान नसे त्याजला ॥
मुनि जाता त्याचा मान नसे राखिला ॥
भाजने घडवितो ज्ञान नसे याजला ॥
जावे वैकुंठासी पाहू त्याची कला ॥
रत्नजडित मंचकी शेषशयन नीजला ॥
ती सिंधुतनया कोमल चरणा चुरी ॥का०॥२॥
विधितात असा तो अनंत शय्येवरी ॥
पाहुन भृगुने लाथ मारिली उरी ॥
इंदिरारमण तो धाउनि चरणा धरी ॥
मी विषयसुखाच्या निजलो शेजेवरी ॥
मम ह्रदय कठिण किति कासव पृष्ठापरी ॥
श्रम झाले मुनीला लाथ मारिता उरी ॥
म्हणे लक्ष्मी आणी घृत जाउनि झडकरी ॥
तू वाम चरण चुर दक्षिण चोळिति हरी ॥ए०॥३॥
पाहूनि लक्ष्मी संतापे अंतरी ॥
नको संगत तुमची जाते मी करविरी ॥
दास्यत्व निरंतर करित असा तुम्हि हरी ॥
नाहि लाज तुम्हाला काय म्हणावे तरी ॥
परब्रह्म अहां तुम्हि लाथ मारितो उरी ॥
त्या ब्राह्मण अधमा नसे दया अंतरी ॥
आजपासुन त्यांच्या राहत नाही मी घरी ॥का०॥४॥
चहु वर्णामाजी श्रेष्ठ विप्र मानिले ॥
विधिधावा ऐकुनि चहु वेदा रक्षिले ॥
त्या गजेंद्राचे ब्रीद मि सांभाळिले ॥
त्या अंबरिषाचे गर्भवास चुकविले ॥
त्या प्रल्हादाला संकटि म्या पाळिले ॥
ते ध्रुव बालक मी अढळ पदी बसविले ॥
त्या सुदामजीला दिधली कांचनपुरी ॥कां०॥५॥
पतिवाक्य ऐकुनि अंबा नमि पाउले ॥
करविरा येउनी सिंहासन स्थापिले ॥
चिर कंचुकि नेसुनि मुकुट कर्णि कुंडले ॥
मणि मंगळसूत्र भाळि कुंकु शोभले ॥
करि कंकण घालुनि नूपुर चरणी भले ॥
ते रूप पाहुनी मन माझे गुंगले ॥
शेजारति घ्याया नित्य येति श्री हरी ॥कां०॥६॥
ज्ञान पोत घेउनी नाचत कृष्ना सती ॥
स्वानंदमंडपी गोंधळही घालिती ॥
झोटिंग काम हा गांजितसे दुर्मती ॥
भवताप निवारुनी देइ मला सुमती ॥
श्री भागवतामध्ये व्यास कथा वर्णिती ॥
अभिमन्युसुतासी शुक प्रेमे सांगती ॥
महाकाली महालक्ष्मि सरस्वती ॥
हे अनाथनाथे तारि तारि मजप्रती ॥
हे जगज्जननि तू ठेवि अभय कर शिरी ॥कां०॥७॥