कुसुम स्वर्गिचे नारद हरि ते ॥
देत प्रमोदे रुक्मिणि करि ते ॥
हे कळवी सखि भामेला ॥
का आला मम महाला ॥
म्हणे भामा श्रीरंगाला ॥धृ०॥१॥
त्यागुनि शय्या भूमिवरि या ॥
का निजली सत्राजित-तनया ॥
सखयांनो झडकरि बोला ॥
हरि वदला भामेला ॥
पुरविन मी तव हट्टाला ॥२॥
जरि नावडते हरि मी आता ॥
तरि का घडि घडि सदनी येता ॥
ही भ्रांती पडत मनाला ॥कां०॥३॥
सोळा सहस्त्र जरि मज युवती ॥
परि पूर्णचि तुजवरती प्रीती ॥
धरि चित्ती मम वाक्याला ॥हरि०॥४॥
जरि आवडते हरि मी तुम्हा ॥
तरि सवतिस का देता कुसुम ॥
हे योग्यचि नच तुम्हाला ॥का०॥५॥
हरि म्हणे इतुक्यासाठी रुसणे ॥
हे योग्यचि नच तुज मृगनयने ॥
तव अंगणि लाविन तरुला ॥हरि०॥६॥
करि समजुत हरि अंकी धरुनी ॥
दे आलिंगन प्रेमे करुनी ॥
नमि कृष्णा त्या उभयाला ॥का०॥७॥