हे मंगलागौरी माते दे अखंड सौभाग्याते ॥धृ०॥
मम तनुचा मंडप करुनी ॥
आत सिंहासन षट्कोनी ॥
चहु मुक्ति कदलि उभवोनी ॥
बैसवुनी माय भवानी ॥
छत तोरण झालर वरुनी ॥
शोभते ज्ञान दीपांनी ॥चाल॥
केर नाम क्रोध झाडोनी ॥
भक्ति रंगवल्लि काढोनी ॥
उपचार पुढे मांडोनी ॥
ठेविले सकळ पुजनाते ॥हे मंग०॥१॥
ह्या श्रावण मंगळवारी ॥
जमविल्या नगरिच्या नारी ॥
ही षोडश परिची पत्री ॥
घेऊनि सकल उपचारी ॥
ह्या सौभाग्यालंकारी ॥
पूजिते त्रिपुरसुंदरी ॥चाल॥
करि घेऊन कर्पुरारती ॥
मी ज्ञान उजळिल्या वाती ॥
पुष्पांजळि घेउनि हाती ॥
प्रार्थना हीच शिव-कांते ॥हे मंग०॥२॥
पैठणी नेसली पिवळी ॥
आरक्त अंगि कांचोळी ॥
मंगळसूत्र गरसोळी ॥
लाल कुंकू शोभत भाळी ॥
नथ बुगड्या भोकर बाळी ॥
कंकणे हातामधि काळी ॥चाल॥
नग गोंडे फुलांची वेणी ॥
सरि साज पोत तन्मणी ॥
रुणझुणती नेपुर चरणी ॥
करि भक्तमनोरथ पुरते ॥
हे मंग०॥३॥
त्या राजसुतेसम द्यावा ॥
वर, सौभाग्याचा ठेवा ॥
मम कुळी सतत असावा ॥
भवरोग गृहांतुनि जावा ॥
मागते बालस्वभावा ॥
तव गुणानुवाद मि गावा ॥चाल॥
ही क्षणिक अशाश्वत काया ॥
हे जाणून अंबूतनया ॥
शिवकांते लागत पाया ॥
दे इच्छित कृष्णेते ॥हे मंग०॥४॥