रुक्मिणिकांता धाव अकांता रक्षी श्रीरंगा ॥
दुःशासन हा येउनि माझ्या झोंबतसे अंगा ॥धृ०॥
ऋतुमती मी एकटि असता मंदिरि तो शिरला ॥
धरुनि वेणिला ओढि फरफरा सभेमधे मजला ॥
पाच पती जिंकुनि विजयी दुर्योधन झाला ॥
कपट द्यूत खेळोनि पणामधे जिंकि पांडवाला ॥
पंडु कुमरहो आजि पराक्रम कोणिकडे गेला ॥
भिंतीवरच्या चित्रासम तुम्ही स्वस्थ कसे बसला ॥
कपटि दुरात्मा शकुनीमामा करितो बहु दंगा ॥रु०॥१॥
नष्ट कर्ण हा म्हणतो वहिनी ऐका मम वचता ॥
दुर्योधनाच्या अंकि बसूनी व्हा त्याची ललना ॥
बलहीन झाले पाचहि पति तव दे सोडुन त्यांना ॥
चांडाळाने ह्रदय भेदिले सोडुनि वाग्बाणा ॥
संकटकाली दुजा न वाली ऐकावी करुणा ॥
मन वारूवरि बसुन झडकरि ये धावत कृष्णा ॥
तूहि भीमके त्वरा करूनी पाठवि अरिभंगा ॥रु०॥२॥
पांचाळीचा ऐकुनि धावा लगबग पळति हरी ॥
नाभी म्हणुनी दे आलिंगन नेसवि शेलारी ॥
शुभ्र पातळ लाल कुसुंबी शालू बुट्टेरी ॥
खडी चौकडी मुगवी चुनडी पैठणि जरतारी ॥
शेवटि हरिने निज-पीतांबर नेसविला कुसरी ॥
त्यासि ओढिता मूर्च्छा येउनि पडला भूमिवरी ॥
करी सुदर्शन घेउनि केले शत्रुगर्वभंगा ॥रु०॥३॥
वाटे द्रौपदी कृष्णरूप ती चतुर्भुजा झाली ॥
चांडाळाच्या मुखावरी मग काळोखी आली ॥
भीष्म द्रोण कृप विदुरादिक ते वाजविती टाळी ॥
सभेमधे ती क्रुद्ध होउनी गर्जत पांचाळी ॥
बसेल अंकी दुर्योधनाच्या भीमगदा बाळी ॥
बळे रणांगणि सूतकुमारा होउनि वेल्हाळी ॥
शर-शयनावरि निद्रा करिलचि निज बंधूजवळी ॥
अंध श्वशुर ते पाहति कौतुक नयनी त्या वेळी ॥
बहु शिण आला फिरता मजला चौर्याशी पिंगा ॥
हरिचरणांबुजि नमिते कृष्णा सोडवि भवसंगा ॥रु०॥४॥