का घालविसी घडि घडि वाया ॥
मनुजा क्षणभंगुर ही काया ॥धृ०॥
काम-रती एकाती रमता ॥
रज रेत जमता बनली ही काया ॥का०॥१॥
मुळिंचा निराकृती येसि आकार ॥
त्यावरि पडलीसे मायेचि छाया ॥का०॥२॥
पंच प्राण दश छिद्र त्रिगुण ॥
देतो दयाघन तुज लवलाह्या ॥का०॥३॥
फेरे फिरसी लक्ष चौर्याशी ॥
अवचित लाभली तुज नर काया ॥का०॥४॥
उत्तम वर्णी पंगू नसोनी ॥
करि सार्थक त्यजुनी विषया ॥का०॥५॥
धर सत्संगा कर भवभंगा ॥
भज श्रीरंगा स्मर गुरुपाया ॥का०॥६॥
हरिभजनी रत त्यागुनि धन-सुता ॥
कृष्णा विनवित अतिंमूढ जाया ॥का०॥७॥