आता ऊठ वेगे हरी उदय झाला ॥
अंशू प्रकाशित नभि भानु आला ॥धृ०॥
लोपली ही निशा, उगवलीसे दिशा ॥
मुनीगण मानसा, स्वस्थ केले ॥
पूतनाशोषणा, काळियामर्दना ॥
उठ जगजीवना, उशिर झाला ॥आता०॥१॥
वत्स हंबारले, धेनु पान्हावल्या ॥
गोठणी बांधिले सोडि त्याला ॥
काळि घे घोंगडी पादुका करि छडी ॥
धेनु ने तातडी यामुनाला ॥आता०॥२॥
ऊठि बा घननिळा, दावि मुख-उत्पला ॥
तेज-नभमंडळा पाहि रविचे ॥
ऊठि बा राजसा, भक्षि हा अनरसा ॥
संगे घे गोरसा भाकरीला ॥आता०॥३॥
राधिका सुंदरी पातलीसे हरी ॥
नेउ पाहे घरी खेळु खेळा ॥
ऊठ हरि जिवलगे, गोप बालक उभे ॥
दावि मुख-चंद्र गे सवंगड्याला ॥आता०॥४॥
यशोदा सुंदरा उठवि मुरलीधरा ॥
तान्हिया लेकरा सांडि शयना ॥
ऊठि बा यदुविरा, मुरलि घेउनि करा ॥
वाजवी सुस्वरा वेणुनादा ॥आता०॥५॥
ऊठि मन-मोहना, चुकवि भवयातना ॥
कृष्णि करि प्रार्थना ॥
रक्षि इजला ॥ विषमकाळी तुशी, झोपतरि ये कशी ॥
तारि संकटि मशी विश्वपाळा ॥आता॥६॥