तुटलेले दुवे - होवो वादळ भोवती कितिकदा, ...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
होवो वादळ भोवती कितिकदा, ऊत्तुङग जो स्थावर,
घेऊ हैमसमाधि शङकर जया रम्य स्थळीं दुर्गम,
त्या गौरीशिखरासमान अथवा जावा तयाच्यावर,
घाला कृत्रिम ऊन्च बान्ध असला प्रवृत्तिला भक्कम.
शास्त्रांतील तुम्हां न जीवन दिसे, काढूनि घ्या पत्थर,
शब्दांचा मग कीस काढुनि चिणा त्याच्याच ते कर्दमीं;
ठेवा त्यावरती अशङकर असा बागूल - तो सङकर;
दास्यें रुढि गणा स्वधर्म, मिरवा हिन्दुत्व वर्णाश्रमीं,
प्रीतीची चिमणीच लाट धरणें फोडी अशी शम्भर,
अस्वाभाविक बन्धनें तटातटा तोडी कशी लीलया !
प्रीतीवीण समाजदण्डक हुके, प्रीतीच विश्वम्भर,
स्वर्ग प्रीतिविना गमे निरय तो, वाञ्छी न कोणी तया.
दर्जा, जात, तसाच पन्थ - तुटुनी गेले पहा बन्ध ते;
तोडी ती अभिनन्दनीय ! - भलतें कां हें हृदीं स्पन्दतें ?
२१ ऑगस्ट १९१३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP