तुटलेले दुवे - ज्या छायेस्तव मीं तुझ्या ...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
ज्या छायेस्तव मीं तुझ्या विनवण्या केल्या, वृथा जाहल्या,
गे लावूनि जिवास मी किति तुझें नैष्ठुर्य तें घेतलें !
‘माझें दैव असेंच !’ मन्त्र जपतां प्राणावरी बेतलें.
गेलें दुक्ख थिजूनि आणि सरसी डोळ्य़ांतल्या आटल्या.
गेला काळ, सुधारली स्थिति, बुजे क्रूर स्मृती मागली,
माझ्यापासुनि तोंच चोरुनि दिली अन्यास छाया तुवां,
ऐकाशी निखळूनि जोडूनि दिला तो तू दुज्याशी दुवा -
थोडीशी रुजली कुठे जखम तों वाहूं पुन्हा लागली.
काही या पुढती तुला जर कधी द्यावें मला वाटलें
त्या वेळीं तर तू कृपा करुनि ती सद्वासना आवरीं,
राहो दूरच शान्ति, मीठ जणु तें होऊल घावावरी; -
साङगूं काय कसें तुला हृदयिं जें माझ्या असे दाटलें !
आत्मप्रौढि ऊगाच कोठवर ही रे मत्सरी कीटका ?
प्रीतीने तुज यापरी हिणवितां घोटाळतो जीव कां ?
१९ जुलै १९१३
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP