आकाशीं नच सूचिकाग्रहि कुठे राही निरभ्र स्थळ,
काळें राक्षससैन्य हें चहुकडे विस्तारलें अम्बरीं,
झालें देव समस्त निष्प्रभ नभोयुद्धामधे तुम्बळ,
नाचे मात्र जणू सुराच असुरी - विद्युल्लता सुन्दरी.
जाळी, बीळ, गुहा, कपाट, घरटें. खेडें, दरी, डोङगर -
सारीं स्तब्ध ! चपापलें जग नभीं पाहून हें वादळ.
सेना - राजवटींत जीवन कसें लोपे, न हो गोचर,
झञ्झावात पिसाट मात्र भवती धावे, करी जागल.
मी ओटीवर नेत्र झाकुनि पडें माझ्या विछान्यावरी
तों औकूं मज शीळ ये, किति तरी सुस्निग्ध गम्भीर ती !
हो आता अवतीर्ण कोण कुठुनी ? हो मन्मती बावरी,
तू तेजस्विनि, कोण शुक्रतनया कीं ऊर्वशी कीं रती ?
आलों मोहिनि, थाम्ब थाम्ब चपले ! टाकूनि जाशी कुठे ?
तों “कोठे नर तू, कुठे अमर ती ?” ही व्योमवाणी कुठे.
३ जून १९१७