तुटलेले दुवे - डोळ्यांनी शव पाहण्याहुनि ...
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
डोळ्यांनी शव पाहण्याहुनि गमे ती मृत्युवार्ता बरी,
भासे सौम्यच काळदूत तुळितां साक्षात कृतान्तापुढे,
फाशीची कळतां सजा कळ कुठे नि:संज्ञ चित्तीं तरी
होती पाय शिडीवरी लटलटा भारावुनी बापुडे.
आता ऐक मुहूर्त, टाक पिऊनी हाला न,हालाहल,
क्रव्यादग्निचिता पुढे धडधडे गा हें नसे बोहलें.
नाही मङगलवाद्यघोष बघ हा, हा घोर कोलाहल,
डोळ्यांनी मरणास देख अपुल्या, भोगूनि घे सोहळे.
गेले लोपुनि चन्द्रसूर्य, नसती तारे अता जागृत,
कोन्दे धूरच धूर ऐक गगनीं, मी काय पाहूं तमीं ?
अद्यापि प्रळयांत या मन कसें माझें न होऊ मृत ?
आता मी न जिवन्त, न मृतहि मी, झालों जितें भूत मी.
जाणें शक्य मला न जेथ ऊजळी आरक्त आशा दिशा,
‘तू माझाच, रणीं अफाट फिर जा’ बोले निराशा - निशा.
४ जानेवारी १९२९
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP