तुटलेले दुवे - चन्द्राची युवतीमुखास ऊपमा...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
चन्द्राची युवतीमुखास ऊपमा देती कशाला कवी
हें पूर्वी न मला रहस्य कळलें. चित्रांतलें हें मुख
पाहुनी मज ती अपूर्णच गमे. चन्द्रास हें लाजवी,
की याच्यावर निष्कलङक विहरे बुद्धीसवें कौतुक.
आकाशीं ढग फाल्गुनी विखुरतां कापूसराशींपरी
खेळे चन्द्र लपाछपी ऊडुगणांसङगें. दिसे तो सुखी;
अभ्राचें छत होय पातळ यदा पाऊस झाल्यावरी
फैलावे स्मित सौम्य गुप्त रविचें सार्या नभ:श्रीमुखीं.
द्दश्यें सुन्दर आणि अप्रतिम हीं, तैसें तुझें दर्शन;
द्दश्यें मोहक चिन्तनीय जशिं हीं तैसे तुझे लोचन;
कां सौन्दर्यचकोर पाहुनि तुला मानील तो हर्ष न ?
आहे काय पुढे भविष्य भय तें नाहीच. सडकोच न.
छाये, चोरुनि मी न ठेविन तुला, येथे रहा वा दुरी,
या जीवास पुरे दिली क्षणिक ही ऊदबोधिनी माधुरी.
२७ जुलै १९२२
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP