तुटलेले दुवे - प्रात:कालिं अता तुझें नच ...
सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
प्रात:कालिं अता तुझें नच घडे सुस्निग्ध तें दर्शन
की ज्याच्या शकुनें सबन्ध मग तो जावा सुखाने दिन:
लाभेना तुजहातचें गरिबिचें स्वादिष्ट तें जेवण
की जेणें मुठमूठ मांस चढुनी यावें मला मीपण.
तो वेडा अभिमान, भीतिहि खुळी ती माझियाकारणें,
तो पाठीवर जीर्ण हात फिरणें, ऐकेरि हाकारणें,
बाहेरील विचारपूस करणें, तें मोकळें बोलणें,
पोथी वाचुनि झोपणें - स्मरुनि हें ओलावती लोचनें,
आऊ गे, हृदयास घट्ट करुनी येऊं दिलें तू मला,
सेवेला भलत्याचिया जिव धनापायींच लालूचला :
या वेळीं असशील आठवत तू मातें प्रभूच्या स्तवीं.
मी घेऊनि ऊशास चौघडि तुझी तूतेंच गे आठवीं.
यावी झोप तुला म्हणून भजनें गायास नानाविध,
चेपाया तव पाय हाय ! जननी, मी कां न गे सन्निध ?
२४ फेब्रुवारी १९२२
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP