ज्येष्ठशुद्ध दशमीला गंगेचा अवतार झाला. या दशमीला दशहरा असें नांव आहे. त्या दिवशीं जे दहा योग सांगितले आहेत, ते असे : -
१) ज्येष्ठमास,
२) शुक्लपक्ष,
३) दशमी,
४) बुधवार,
५) हस्तनक्षत्र,
६) व्यतिपात,
७) गर
८) आनंदयोग,
९) कन्याराशीचा चंद्र आणि
१०) वृषभ राशीचा रवि.
गर या नांवाचें करण आहे. बुधवारीं हस्तनक्षत्र असतां आनंद नांवाचा योग होतो. या ठिकाणीं दशमी आणि व्यतिपात हीं मुख्य आहेत; म्हणून ज्या वेळीं यांपैकीं ज्यास्त योगांनीं युक्त अशी दशमी पूर्वाह्नकाळीं असेल, ती दशहराव्रताला घ्यावी. दशमी जर पूर्वाह्नीं असेल, तर ज्या दिवशीं अधिक योग असतील ती घ्यावी. ज्येष्ठाचा महिना जर अधिक असेल, तर अधिक महिन्यांतहि दशहराव्रत करावें, शुद्ध महिन्यांत करुं नये. कोणच्याहि युगांत दशहराव्रत पुढें नेऊं नये असें हेमाद्रींत ऋष्यश्रृंगाचें वचन आहे, म्हणून, हें व्रत अधिकमासांतच करावें. काशीक्षेत्रांत राहाणार्यांनीं या दिवशीं दशाश्वमेधतीर्थांत व इतरांनीं संनिध असलेल्या नदींत स्नान करुन गंगापूजनादिक करावें.