समर्थ असेल त्याने भाद्रपदातील कृष्णपक्षी प्रतिपदेपासून आरंभ करून अमावास्येपर्यंत महालय करावे. तिथीची वृद्धि असेल तर सोळा महालय करावे, वृद्धि अथवा क्षय यांचा अभाव असेल तर पंधराच महालय करावे. तिथीचा क्षय असेल तर चवदाच करावे. सर्व करण्यास असमर्थ असेल त्याने, षष्ठी, अष्टमी, दशमी, एकादशी इत्यादिकापैकी एका तिथीचे दिवशी आरंभ करून अमावास्येपर्यंत महालय करावे. इतकेही करण्यास असमर्थ असेल त्याने निषिद्ध नाही अशा एका दिवशी एकदाच महालय करावा. प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत सर्व दिवशी महालय करण्याचा जो पक्ष सांगितला त्याविषयी चतुर्दशी वर्ज्य नाही. पंचमीपासून अमावास्येपर्यंत महालय करण्याचे जे निरनिराळे पाच पक्ष सांगितले त्यांमध्ये चतुर्दशी वर्ज्य करून इतर तिथींचे दिवशी महालय करावे. एकदा महालय करण्याच्या पक्षीही चतुर्दशी वर्ज्य करावी. एकदा महालय करण्याविषयी प्रतिपदा, षष्ठी, एकादशी, चतुर्दशी, शुक्रवार, जन्मनक्षत्र, जन्मनक्षत्रापासून दहावे आणि एकोणिसावे नक्षत्र, रोहिणी, मघा, रेवती ही वर्ज्य करावी. त्रयोदशी, सप्तमी, रविवार, मंगळवार हे देखील वर्ज्य करावे असे क्वचित ग्रंथामध्ये सांगितले आहे. पित्याचे मृत तिथीचे दिवशी एकदा महालय करणे असेल तर त्याविषयी प्रतिपदा इत्यादि निषेध नाही. कारण, 'पंधरा दिवस महालय करण्याविषयी अशक्त असेल त्याने पितृपक्षामध्ये एका दिवशी- निषिद्ध दिवशीही - यथाविधि पिंडदान करावे' असे वचन आहे. मृततिथीचे दिवशी श्राद्धाचा असंभव असेल तर निषिद्ध तिथि इत्यादि वर्ज्य करून महालय करावा. त्यामध्येही द्वादशी, अमावास्या, अष्टमी, बरणी, व्यतीपात इत्यादि दिवशी मृततिथि नसली तरी सकृन्महालयाला तिथि इत्यादिकांचा कोणताही निषेध नाही. संन्यासी यांचा महालय अपराह्णव्यापिनी द्वादशीचे दिवशीच सपिंडक करावा. इतर तिथीचे दिवशी करू नये. चतुर्दशीचे दिवशी मृत झालेल्यांचा महालय चतुर्दशीचे दिवशी करु नये शस्त्राने हत झालेल्यांचे श्राद्ध चतुर्दशीचे दिवशी करावे असा नियम सर्वाहून बलिष्ठ आहे. याकरिता प्रतिवार्षिक श्राद्धावाचून इतर श्राद्ध चतुर्दशीचे दिवशी करण्याबद्दल निषेध आहे. याप्रमाणे पौर्णिमेचे दिवशी मृत झालेल्याचाही महालय पौर्णिमेचे दिवशी करू नये. कारण कृष्ण पक्ष नसल्यामुळे पौर्णिमेचे दिवशी महालय प्राप्त होते नाही. यामुळे चतुर्दशी अथवा पौर्णिमा या दिवशी मरण पावलेल्यांचा महालय द्वादशी, अमावास्या इत्यादि तिथीचे दिवशी करावा. महालयाविषयी कन्यास्थ रवि प्राशस्त्यसंपादक आहे, निमित्त नाही. कारण आरंभी, मध्ये अथवा अंती जेव्हा रवि कन्या राशीला जातो तेव्हा तो सकल पक्ष सोळा श्राद्धांविषयी पूज्य आहे असे स्मृतिवचन आहे. अमावास्येपर्यंत तिथींचे ठिकाणी महालयाचा असंभव असेल तर वृश्चिक संक्रांतीपर्यंत व्यतीपात, द्वादशी इत्यादि सर्व दिवशी करावा. (हे श्राद्ध मलमासात करू नये असे भृगूचे वचन आहे.) मृतदिवस, महालय इत्यादिक श्राद्ध पक्वानेच करावे. आमान्नाने करू नये. "महालय, गयाश्राद्ध, मातापितरांचा मृतदिवस, यांचे ठिकाणी विवाहिताने देखील यथाविधि पिंडदान करावे."