सूर्योदयापासून सहा घटकांहून जास्त व्यापिनी व भद्ररहित अशा श्रावणी पुनवेला अपराह्णकाळी अथवा प्रदोषकाळी राखी बांधावी. दुसर्या दिवशी सूर्योदयानंतर पुनव जर सहा घटकांपेक्षा कमी असेल तर आदल्या दिवशी भद्रा वर्ज्य करून प्रदोषकाळी राखी बांधावी. राखी बांधण्याचे काम ग्रहण व संक्रांति जरी असतील तरी करावे. रक्षाबन्धनमंत्र -
'येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः । तेन त्वाभिबध्नानि रक्षे माचलमाचल ॥'
याच पुनवेला हयग्रीवाचा अवतार झाला. कुलधर्म वगैरे कर्मांना जी पौर्णिमा घेणे ती सहा घटका सायाह्नव्यापिनी व पूर्वतिथीने विद्ध अशी असणारी घ्यावी. आदल्या दिवशी जर सायान्हकाळी सहा घटकांहून कमी असेल, तर दुसर्या दिवसाची घ्यावी. श्रवणाकर्म आणि सर्पबलि ही दोन कर्मे याच पुनवेला रात्रो आश्वलायनांनी करावीत. तैत्तिरीयशाखीयांनी फक्त सर्पबलि करावा. कात्यायन व सामवेदी यांना श्रवणाकर्म व सर्पबलि अशी दोन्ही कर्मे करावीत. श्रवणाकर्म, सर्पबलि, आश्वयुजीकर्म व प्रत्यव रोहिण वगैरे ज्या पाकसंस्था, त्या योग्य वेळी न केल्यास प्राजापत्यप्रायश्चित्त करावे, इतर वेळी त्या करू नयेत. बायको जरी विटाळशी असली, तरी श्रवणाकर्म वगैरे संस्था कराव्या. पहिल्यानेच जर आरंभ करायचा असेल तर मात्र वरील दोष असता करू नये. श्रवणाकर्माला जी पुनव घ्यायची ती, सूर्यास्तापासून आरंभ करून सर्व कर्म पौर्णिमा असतानाच समाप्त होईल इतकी व्याप्ति जर पूर्व दिवशी असेल, तर पुर्व दिवसाची घ्यावी व तशी व्याप्ति जर दोन दिवस असेल अथवा दोन्ही दिवशी नसेल तर दुसर्या दिवसाची घ्यावी. श्रवणाकर्माचा प्रयोग आपापल्या सूत्रात पहावा. श्रावण वद्य चतुर्थीपासून आरंभ करून दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला यावजन्म अथवा एकवीस वर्षे किंवा एक वर्ष संकष्टचतुर्थीचे व्रत करावे. अशक्ताने दरवर्षी श्रावणकृष्ण चतुर्थीला करावे. संकष्टचतुर्थीव्रत घेणे ते, जी चतुर्थी चंद्रोदयकालव्यापिनी असेल तिच्यावर घ्यावे, असा निर्णय पहिल्या परिच्छेदात पूर्वी सांगितलाच आहे. याच्या उद्यापनासह व्रताचा प्रयोग कौस्तुभ वगैरे ग्रंथात पहावा.