भाद्रपद शुद्धातल्या हस्तनक्षत्राचा काळ हा सामवेद्यांच्या उपाकर्माचा मुख्य काळ होय. संक्रान्ति वगैरेच्या अडथळ्याने जर उपाकर्म करण्यास विघ्न येईल, तर श्रावणातले हस्तनक्षत्र घ्यावे असे निर्णयसिंधुत सांगितले आहे. भाद्रपदातल्या हस्तनक्षत्रात जर काही दोष असण्याचा संभव असेल, तर श्रावणी पुनवेला उपाकर्म करून, भाद्रपदातल्या हस्तनक्षत्रापर्यंत अध्ययन न करता, त्यानंतर अध्ययन करावे, असे इतर ग्रंथकार म्हणतात. हस्तनक्षत्र खंडित असून अपराह्णकाळी जर एकदेशस्पर्श असेल, तर दुसर्या दिवशीच उपाकर्म करावे. पहिल्या दिवशी जर अपराह्णकाळी पूर्ण व्याप्ति असेल, तर सर्वच सामवेद्यांना अपराह्णकाळ हाच उपाकर्माला योग्य काळ असल्याचे वचन आहे; यास्तव त्यांनी पहिल्या दिवशीच उपाकर्म करावे. पहिल्या दिवशी जर अपराह्णकाळी एकदेशस्पर्श असेल तर, अथवा दोन्ही दिवशी जर अपराह्णकाळी स्पर्श नसेल, तर दुसर्या दिवशीच उपाकर्म करावे. ज्या सामवेद्यांना प्रातःकाळ व संगवकाळ हे उपाकर्माचे काळ सांगितले आहेत त्यांनी, पूर्व दिवशी जर अपराह्णकाळी व्याप्ति असेल, तर ती टाकून दुसर्या दिवशी संगवकाळानंतर जे हस्तनक्षत्र असेल ते घ्यावे, असा सिंहस्थ सूर्य असता ज्या उपाकर्माबद्दल निर्णय सांगितला आहे, तो निर्णय, श्रावणात सिंहस्थ सूर्य असून, हस्त किंवा पौर्णिमा जर येतील, तर त्या दिवशी उपाकर्म करावे व कर्केचा सूर्य असल्यास करू नये, असा जो निर्णय सांगितला, तो निर्णय हस्तनक्षत्र व पौर्णिमा यांचा सामवेद्यांसंबंधाचा जाणावा. जे इतर शाखांचे असतील त्यांना सिंहस्थ रवीचा विधि अथवा निषेध नाही. अथर्ववेद्यांनी-श्रावणी पुनव अथवा भाद्रपदी पुनव-उपाकर्माला घ्यावी. तिथि जर खंडा असेल, तर उदयापासून संगवकालापर्यंत व्याप्ति असेल ती तिथि घ्यावी. श्रावण व भाद्रपद या महिन्यातल्या ज्यांच्या त्यांच्या गृह्यसूत्रात सांगितलेल्या काळी जर ग्रहण, संक्रान्ति, अशौच वगैरे दोष उत्पन्न होतील, आणि त्यामुळे कर्म करण्यास जर अडचण येईल, तर सर्व शाखीयांनी, दुसर्या शाखात सांगितलेले काळ (सोयस्कर असे) अवश्य घ्यावेत. त्यातल्या त्यात-आपस्तंब, बौधायन व सामवेदी- यांना जर श्रावण व भाद्रपद यातल्या पंचमी-पौर्णिमा घेणे जरूर पडतील, तर नर्मदेच्या उत्तरेकडे सिंहस्थ रवि असता, पंचमी वगैरे काळ घ्यावेत. रवि कर्कस्थ असता नर्मदेच्या दक्षिणेस श्रावणातली पंचमी वगैरे काल कौस्तुभात ज्याअर्थी सांगितले आहेत त्याअर्थी, सर्वथाच जर कर्मलोप होत असेल, तर सिंहस्थ सूर्य, कर्कस्थ सूर्य, वगैरे जी व्यवस्था पुर्वी सांगितली, तीवरून ऋग्वेद्यांनीही पौर्णिमासुद्धा घ्यावी असे मला वाटते. (उपाकर्माचा) मुख्य काळ जो श्रावण, त्यामध्ये पाऊस न पडल्याने व्रीहि (देवभात) वगैरे वनस्पती जर झाल्या नसतील तर, अथवा अशौच वगैरे जर (विघ्ने) आली असतील, तर भाद्रपदातले श्रवणनक्षत्र वगैरे जे काळ, ते सर्वशाखीयांनी उपाकर्माला घ्यावेत. वनस्पति जरी उत्पन्न झाल्या नसल्या, तरी श्रावणातच उपाकर्म करावे, असे कर्कादिकांचे मत आहे. सर्वशाखीयांच्या गृह्यसूत्रात उपाकर्माचा जो मुख्य दिवस सांगितला, त्या दिवशी जर ग्रहण अथवा संक्रान्ति असेल, तर संक्रान्तिरहित असे पंचमी वगैरे काळ घ्यावेत. येणार्या मध्यरात्रीच्या पूर्वी दोन प्रहर, गेलेल्या मध्यरात्रीच्या नंतर दोन प्रहर आणि दिवसाचे चार प्रहर, या अहोरात्रात जर ग्रहण व संक्रान्ति यांचा योग असेल, आणि श्रवण नक्षत्र, पुनव वगैरे तिथींना त्यांचा स्पर्श होत नसेल, तर तो योग उपाकर्माला अयोग्य होतो. या सांगितलेल्या आठ प्रहरांहून इतर वेळीही ग्रहण अथवा संक्रान्ति यांचा योग असून, उपाकर्माला ग्राह्य अशी श्रवणादि नक्षत्रे व पौर्णिमादि तिथि यांना स्पर्श करणारा जरी असला तरी तो काळ उपाकर्माला बाधक होतो, असे काही ग्रंथकार म्हणतात. ज्याची मुंज नवीनच झाली असेल त्याची पहिली श्रावणी, गुरुशुक्रांचे अस्तादिक, मलमासादिक आणि सिंहस्थ गुरु अशा प्रसंगी करू नये. दुसरी, तिसरी वगैरे श्रावण्या अस्तादिकातहि कराव्या. मात्र मलमास असल्यास दुसरी, तिसरी वगैरे करू नयेत. प्रथम उपाकर्म करणे ते, पुण्याहवाचन, नांदीश्राद्ध वगैरे करून नंतर करावे. नवीनच मुंज झालेल्याची श्रावणी जर श्रावणातल्या पंचमी, हस्त, श्रवण वगैरे काळी गुरुशुक्रांच्या अस्तादिकांमुळे व होईल, तर ती भाद्रपदातल्या पंचमी, श्रवण वगैरे काळी करावी. ब्रह्मचार्याने-मौज, यज्ञोपवीत, नवा दंड, कृष्णाजिन, कटिस्त्र व नवे वस्त्र-ही धारण करावी. हा ब्रह्मचार्याच्या संबंधाने दरवर्षी विशेष जाणावा. उपाकर्म आणि उत्सर्जन (नवे जानवे घालेणे व जुने काढून टाकणे, ही कर्मे-ब्रह्मचारी, सोडमुंज झालेले, गृहस्थ व वानप्रस्थ या सर्वांनी करावीत. उत्सर्जनाचा काल येथे न सांगण्याचे कारण असे की, 'अथवा उपाकर्माच्या दिवशी करावे' या वाक्यावरून, उपाकर्माच्या दिवशीच उत्सर्जन करण्याचा सर्व शिष्टांचा प्रघात असल्यामुळे, त्या निर्णयाचा काही उपयोग नाही. उपाकर्म व उत्सर्जन हे विधि जर इतर ब्राह्मणांसह करायचे असतील, तर लौकिकाग्नीच्या ठिकाणी ते करावेत. जेव्हा एकट्यालाच करायचे असतील तेव्हा आपल्या गृह्याग्नीवर करावेत. कात्यायनांनी अन्वाधान केलेल्या अग्नीवर उपाकर्म करावे, लौकिकाग्नीवर करू नये. चतुरवत्ति असा ऋकशाखी जर अनेक चतुरवत्तींसह उपाकर्म करणारा असेल, आणि त्यामध्ये जर एक जामदग्नि वगैरे पंचावति असेल तर चतुरवत्तीयांनीही कर्म पंचावत्त करण्यास विकल्प आहे, आणि तसे पंचावत्त कर्म केले असता त्यांच्या त्या कर्माला वैगुण्य येत नसल्याने, पंचवत्तीच्या अनुरोधाने पंचावत्त कर्मच करावे. उपाकर्म आणि उत्सर्जन ही कर्मे जर केली नाहीत, तर दोष असल्याने, ती दरवर्षी करावीत. उपाकर्म आणि उत्सर्जन ही कर्मे न केल्यास, प्राजापत्य कृच्छ्र अथवा उपास करावा, असे प्रायश्चित्त निर्णयसिन्धूच्या एखाद्याच प्रतीत आढळते, सर्व प्रतीत आढळत नाही. उत्सर्जन व उपाकर्म या दोहोतही ऋषिपूजन करावे. ऋषि वगैरेचे तर्पण उत्सर्जनातच करावे. लग्न झाल्यावर उपाकर्मात तिलतर्पण करण्यात दोष नाही. उत्सर्जनाच्या संकल्पाविषयींचा विशेष येणेप्रमाणेः-
'अधीतानां छन्दसामाप्यायनद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं उपाकर्मदिने अद्य उत्सर्जनाख्यं कर्म करिष्ये ।'
उपाकर्माचा विशेषः -
'अधीतानां अध्येष्यमाणानां च छन्दसां यातयामता निरासेनाप्यायनद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थ उपाकर्माख्यं कर्म करिष्ये ।'
बाकीचा सारा प्रयोग ज्याने त्याने आपापल्या गृहसूत्राप्रमाणे समजावा. या दोन्ही कर्माबद्दल नद्यांचा रजोदोष नाही. ब्रह्मादि सारे देव आणि ऋषि वगैरेचे जलांपाशी सान्निध्य असते; यास्तव नदीच्या पाण्याने स्नान केले असता, सर्व दोष नाहीसे होतात. ऋषिपूजन ज्या ठिकाणी केले असेल त्या ठिकाणच्या पाण्याने स्नान करून ते प्याले असता सर्व मनोरथ सिद्ध होतात. याप्रमाणे सर्वशाखीयांचा साधारण निर्णय आहे.