नवरात्रकर्मात ब्राह्मणादि चार वर्ण व म्लेंच्छादिकांना अधिकार आहे. ब्राह्मणांनी जप, होम, अन्नबली व नैवेद्य यांनी सात्विक पूजा करावी. 'मद्य हे अपेय व अदेय आहे' इत्यादि निषेधवाक्यांवरून, मांस, वगैरेंनी युक्त अशा राजसपूजेचा ब्राह्मणांना अधिकार नाही. कारण, मद्यपान केल्यास मरणान्त प्रायश्चित्त सांगितले आहे; आणि मद्याचा स्पर्श झाल्यास तो अवयव तोडावा असेही सांगितले आहे. म्हणून, यापेक्षा अल्पप्रायश्चित्ताने दोष नाहीसा होत नसून, पातित्य प्राप्त होते. सर्व प्राचीन व अर्वाचीन निषेधकार याप्रमाणेच निश्चयेकरून लिहितात. नवीन भास्कररायप्रभृति ग्रंथकार देखील सप्तशतीवरील टिकादिकांमध्ये प्राचीन ग्रंथांना अनुसरूनच या निर्बंधाचा पुरस्कार करतात व सभेमध्येही याच मताची जरी प्रशंसा करतात, व सभेमध्येही याच मताची जरी प्रशंसा करतात, तरी आचरण मात्र विरुद्ध करतात. आपण दुर्दैवाने ब्राह्मण्यापासून भ्रष्ट झालो, इतर तरी कोणी होऊ नये अशा भूतदयेने प्रेरित होऊन, ते ग्रंथकार असे सांगतात. अथवा आपले पातित्य झाकण्यासाठी सांगतात, किंवा कलियुगातील इतर ब्राह्मणांना अधिकार नाही असे समजून सांगतात, याबद्दल आम्हाला कशाचीच फोड होत नाही. क्षत्रिय आणि वैश्य यांना मांसादिकांनी युक्त व जप आणि होम यांच्यासहित अशा राजसपूजेचा अधिकार आहे. हा अधिकार केवळ काम्य आहे; नित्य नाही. निष्काम अशा क्षत्रियाने जरी सात्त्विक पूजा केली, तरी मोक्षादिफलाशय प्राप्त होतो. याप्रमाणेच शूद्रादिकांनाही सात्त्विक पूजेने फलातिशय प्राप्त होतो. शूद्रादिकांना मंत्ररहित व जपरहित अशी मांसादिकांनी युक्त तामसपूजा विहित आहे. शूद्राने सप्तशतीपाठ, जप व होम यांनी युक्त सात्त्विक पूजा ब्राह्मणाकडून करवावी. स्त्री व शुद्र यांना स्वतः पुराणमंत्राचा पाठ करण्याचा अधिकार नाही. म्हणून, 'शूद्र सुख पावेल' इत्यादि वाक्यांवरील भाष्यामध्ये, स्त्री व शूद्र यांना श्रवणानेच फलप्राप्ति होते, पाठाने होत नाही असे सांगितले आहे. यावरून, स्त्रिया व शूद्र यांनी गीता व विष्णुसहस्त्रनाम यांचे पाठ केले असता दोष आहे असे समजावे. असे आहे तरी, स्त्रिया व शूद्र यांना पुराणमंत्रानी स्वतः पूजा करण्याचा अधिकार आहे, असेही काही ग्रंथकारांनी लिहिले आहे. यावरून, गीता व विष्णुसहस्त्रनाम यांचे पाठ करण्यास त्यांना दोष नाही असे सिद्ध होते. जपहोमादि कर्म ब्राह्मणाकडून करवावे. म्लेच्छादिकांना जप, होम व समंत्रक पूजा ही ब्राह्मणाकडून देखील करविण्याचा जरी अधिकार नाही, तरी ते सर्व उपचार त्यांनी देवीच्या उद्देशाने मनाने करावेत.