यानंतर रोहिणीयोग असता, शुद्धदम अथवा शुद्धन्यून अष्टमी असून अल्प रोहिणीयोग असला तरी संशय नाही. शुद्धाधिक अष्टमी असून पूर्व दिवशी किंवा दोन्ही दिवशी रोहिणियोग असेल तर पूर्व दिवसाची घ्यावी. शुद्धाधिक अष्टमी असून दुसर्या दिवशीच रोहिणीयोग असेल तर दोन घटिका असेल तथापि दुसर्या दिवसाची घ्यावी. विद्धाधिक अष्टमी असून पूर्वदिवशी निशीथकालाच्या पूर्वी अथवा निशीथकाली रोहिणीयोग असेल तर पूर्व दिवसाची घ्यावी. दोन्ही दिवशी अथवा दुसर्या दिवशीच निशीथकाली अथवा निशीथकाल सोडून रोहिणीयोग असेल तर दुसर्या दिवसाची घ्यावी असा संक्षेपाने निर्णय सांगितला. याप्रमाणे कौस्तुभादिक नवीन ग्रंथांनी ग्रहण केलेल्या माधवमतांच्या अनुरोधाने जन्माष्टमीचा निर्णय सांगितला. या ठिकाणी कोणी ग्रंथकार केवल अष्टमी तीच जन्माष्टमी व जन्माष्टमी रोहिणीयुक्त असेल तीच जयंती असे मानून जयंती व अष्टमी तीच जन्माष्टमी व जन्माष्टमी रोहिणीयुक्त असेल तीच जयंती असे मानून जयंती व अष्टमी या दोहोंचे एकच व्रत सांगतात. दुसरे ग्रंथकार, जन्माष्टमिव्रत व जयंतीव्रत निरनिराळी आहेत याकरिता रोहिणीयोग नसेल तर जयंतीव्रताचा लोप करून जन्माष्टमीव्रत करावे; 'ज्या वर्षी जयंती योग असेल तेव्हा जन्माष्टमी जयंतीचे ठिकाणी अंतर्भूत होते; याकरिता जयंतीचे दिवशी कर्मकाली म्हणजे निशीथकाली अष्टमी नसेल तथापि साकल्य वचनांनी प्राप्त अशी कर्मकालाची व्याप्ति घेऊन दोन्ही व्रते जयंतीच्या दिवशी तंत्राने करावी; दोन्ही व्रते नित्य असून काम्य आहेत; न केल्यास महादोष असून केली असता महाफल आहे म्हणून दोन्ही करावी; नित्यव्रताचा लोप होईल तर दोष आहे याकरिता निशीथकालव्यापिनी अशा पूर्व दिवसाच्या अष्टमीचे ठिकाणी जन्माष्टमिव्रत करून जयंतीचे दिवशी पारणा करू नये; असे म्हणतात. निर्णयसिंधूमध्ये तर पूर्वी सांगितल्या प्रकारे माधवमताचे उपपादन करून हेमाद्रीच्या मते जन्माष्टमी व्रत मात्र नित्य आहे, व जयंतीव्रत नित्य आहे, तथापि ते कलियुगात लुप्त झाले म्हणून कोणी करीत नाहीत असे सांगून आपल्या मते, ज्या वर्षी पूर्व दिवशी निशीथकाली अष्टमी असून दुसर्या दिवशी निशीथकालाहून इतर काली जयंती नावाचा योग असतो ह्याकरिता दोन्ही व्रते नित्य असल्यामुळे न केल्यास दोष आहे म्हणून त्या वर्षी दोन उपोषणे करावी; 'जयंतीचे ठिकाणी जन्माष्टमीचा अंतर्भाव होतो' असे जे वचन आहे ते मूर्खांना फसविण्याकरिता आहे; असे प्रतिपादन केले आहे. कौस्तुभ इत्यादि नवीन ग्रंथांमध्ये ग्राह्य मानलेले माधवमत त्याला अनुसरून जयंतीचा अंतर्भाव करून जन्माष्टमीचेच व्रत करावे हेच योग्य आहे असे मला वाटते. ह्या व्रताचे ठिकाणी बुधवार अथवा सोमवार यांचा योग येईल तर तो प्राशस्त्यबोधक आहे, रोहिणीयोगाप्रमाणे निर्णयापेक्षी नाही.
नंतर दुसर्या दिवशी व्रताचे अंग म्हणून भोजनरूप पारणा सांगितली आहे तिचा काल सांगतो - केवल तिथीचा उपवास असेल तर तिथीच्या अंती पारणा करावी; नक्षत्रयुक्त तिथीचा उपवास असेल तर नक्षत्र व तिथि या दोहोंच्या अंती पारणा करावी. जर तिथि व नक्षत्र यापैकी एकाचा अंत दिवसास असेल व दोहोंचा अंत रात्री असेल तर दिवसासच एकाचा अंत झाल्यावर पारणा करावी. जर दिवसास एकाचाही अंत नसेल तर निशीथकालाच्या (मध्य रात्रीच्या) पूर्वी एकाच्या अंती अथवा दोहोंच्या अंती पारणा करावी. जर निशीथकालाच्या पूर्वकाली एकाचा अगर दोहोंचा अंत असेल तर निशीथकालीही पारणा करावी. भोजनाचा असंभव असेल तर पारणेची सिद्धि होण्याकरिता फलादिकांचा आहार करावा. वर सांगितल्याप्रमाणे निशीथकाली पारणा करू नये, उपवासापासून तिसरे दिवशी दिवसास पारणा करावी असे कोणी ग्रंथकार म्हणतात ते योग्य नाही. अशक्त असेल त्याने एकाचाही अंत होण्यापूर्वी उत्सव समाप्त झाल्यानंतर प्रातःकाली देवपूजाविसर्जन इत्यादि करून पारणा करावी.