आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करावी, म्हणजे नरमेधाचे फळ मिळते. पूर्वाषाढा नक्षत्राने युक्त अशा पुनवेला अन्नपानादिकांचे दान केल्यास अक्षय्य अन्नपानादि मिळतात. पुनवेला श्रीशिवाचा शयनोत्सव करावा. या कर्माला जी पुनव घेणे ती प्रदोषकाळची घ्यावी. याच पुनवेला कोकिळाव्रत करावे.
'स्नानं करिष्ये नियता ब्रह्मचर्ये स्थिता सती । भोक्ष्यामि नक्त भुशय्यां करिष्ये प्राणिनां दयाम् ॥'
असा एक महिन्यापर्यंतचा व्रताचा संकल्प करून, कोकिळारूपी शिवादेवीची पूजा करावी आणि रात्री जेवण करावे. ज्यावर्षी अधिक आषाढ असेल त्या वर्षी हे व्रत करावे. शुद्ध आषाढांत करण्यास कोठेच शास्त्राधार नाही. आषाढ किंवा श्रावण या महिन्यातल्या पुनव, चतुर्दशी किंवा अष्टमी या तिथींवर शिवाचे पवित्रारोपण करावे. आषाढी पुनवेला संन्याशांनी क्षौर करून, चार महिने एकाच जागी राहाण्याचा संकल्प करावा आणि व्यासपूजा करावी, असे सांगितले आहे. या कामासाठी सूर्योदयापासून तीन मुहूर्तपर्यंत असणारी पुनव घ्यावी. चातुर्मास्यांत संन्याशाने (गति) क्षौर करु नये. चार अथवा दोन महिने एकाच जागी रहावे.