कार्तिक शुक्ल चतुर्दशी वैकुंठचतुर्दशी होय. पूर्व दिवशी उपवास करून अरुणोदयव्यापिनी चतुर्दशीला प्रातःकाली शिवाची पूजा करून पारणा करावी. याने चतुर्दशीयुक्त अशा अरुणोदय अहोरात्रामध्ये उपवास केल्याचे फल प्राप्त होते. दोन दिवस अरुणोदयव्याप्ति असेल तर पूर्वदिवशी उपवास करून दुसर्या दिवशी अरुणोदयकाली पूजा करावी. दोन्ही दिवस अरुणोदयव्याप्ति नसेल तर चतुर्दशीने युक्त अशा अहोरात्रामध्येच अरुणोदयकाली पूजा करावी व उपवास पूर्व दिवशी करावा. ही चतुर्दशी विष्णूच्या पूजेला निशीथव्यापिनी घ्यावी. दोन दिवस निशीथव्याप्ति असेल तर निशीथ व प्रदोष हे दोन काल व्यापणारी घ्यावी असे कोणी ग्रंथकार म्हणतात. याच चतुर्दशीचे दिवशी -परविद्धा असेल त्या दिवशी-कार्तिमासव्रताच्या उद्यापनाच्या अंगभूत असा उपवास करून अधिवासन करावे. "रात्री गीत, वाद्य इत्यादि मंगलांनी युक्त असे जागरण करावे. विष्णूच्या जागरामध्ये गीत व नृत्य करणारे मनुष्य सहस्त्र गोदान केल्याचे फळ पावतात" इत्यादि वाक्यांनी विहित अशा गीत, नृत्य, वाद्य, विष्णूच्या चरित्राचे पठन, स्वेच्छालाभ, क्रीडा इत्यादि प्रकाराने हरिजागर करावा. परविद्धा अशा पौर्णिमेचे दिवशी सपत्नीक आचार्याअल पसंत करू "अतोदेवा०" या दोन ऋचांनी तिळ व पायस यांचा होम करून गोदान द्यावे. याप्रमाणे कार्तिकमासाच्या व्रताचे उद्यापन सांगितले. कार्तिक शुक्ल द्वादशी व पौर्णिमा व मन्वादि तिथि आहेत या पूर्वाह्णव्यापी घ्याव्या. इतर प्रयोग पूर्वी सांगितला आहे.