आश्विन आणि कार्तिक या महिन्यांत किंवा अमावास्येला आग्रयण करावे. अथवा महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या कृत्तिकापासून विशाखापर्यंत जी चौदा नक्षत्रे त्यांवर किंवा शुक्लपक्षातल्या रेवती नक्षत्रावर व्रीह्यांग्रयण करावे. याचप्रमाणे, श्रावण व भाद्रपद या महिन्यात, मागे सांगितल्याप्रमाणे पर्वदिवशी किंवा नक्षत्री श्यामाकाचे (सावे) आग्रयण करावे. चैत्र आणि वैशाख या महिन्यातल्या पर्वादिकांवर यवांचे आग्रयण करावे. आग्रयण करण्याच्या पुनवेला संगवकालाच्या आधी पर्वप्रतिपदांचा जर संधि असेल, तर पुर्वदिवशी आग्रयण करून प्रकृतीष्टीचे अन्वाधान करावे. संगवकालानंतर मध्यान्हकाळी किंवा मध्यान्हकाळाच्या आधी जर संधि असेल, तर संधिदिवशी आग्रयणेष्टि करून, प्रकृतीष्टि तत्काली करावी. अमावास्यापर्व असल्यास पूर्वाह्णकाळी किंवा अपराह्णकाळी जर संधि असेल तर योग्य वेळी दर्शेष्टि करून, प्रतिपदेत आग्रयणेष्टि करावी. याचप्रमाणे नक्षत्राग्रयणासंबंधानेही पुनवेच्या आधी आणि अमावास्येष्टीनंतर, जसे जमेल तसे आग्रयण करावे. याबद्दल दीपिकेत 'दर्शेष्टीनंतर व पौर्णिमेच्या आधी आग्रयण करावे' असे सांगितले आहे. 'अथो पूर्वाह्णपक्षक्षये' असा याचा आरंभ असल्याने पूर्वाह्णसंधीत पर्वक्षयाच्या वेळी हा क्रम समजावा, असे हेमाद्रीच्या सिद्धांताला जुळणारे जरी दीपिकेचे मत आहे, तरी संधि कसाही असला तरी तो क्रम असाच होतो, असा कौस्तुभाच्या सिद्धांताशी जमणाराच येथला सिद्धांत जाणावा. या बाबतीत 'अथो' हे पद चकारार्थी योजावे आणि पूर्वाह्णसंधिचे आणि पर्वक्षयाचे जागी असा त्याचा अर्थ करावा. अशी गोष्ट कृष्णपक्षात होत नाही असे यावरून सिद्ध झाले. अमावास्येला आग्रयण करावे असे सांगितले खरे, परंतु अखंड अमावास्येला व्यर्थपणाचे संकट येणार म्हणून, दीपिकाकारांचे मत अयोग्य असल्याबद्दल जे गृह्याग्निसागराचेमत आहे, ते योग्य नाही असे मला वाटते. कारण खंडपर्व असता प्रकृतीच्या नंतर इतर विकृति प्रतिपदेत जरी केल्या तरी पर्वात केल्यासारखेच जसे फळ येते, तसेच अमावास्या जरी अखंड असली तरी प्रतिपदेत करावयाचे, जे आग्रयण, त्याला अमावास्यपर्वाचे फळ मिळण्याच्या संमतीचा संभव होतो. खंड अमावास्या असता, अमावास्या पर्वाच्या विधानाने सार्थक होण्याचा संभव आहे, असा सिद्धांत जाणावा. श्रावण वगैरे महिन्यात जर श्यामाकाचे आग्रयण केले नसेल, तर शरदऋतूंत व्रीहींच्या आग्रयणासह समानतंत्र करावे. त्याबद्दल स्मार्ताग्नीकरिता
'व्रीह्याग्रयणं श्यामाकाग्रयणंच तन्त्रेण करिष्ये' असा संकल्प करावा, आणि इंद्राग्नि व विश्वेदेव या देवतांसाठी सुपांत आठ मुठी तांदूळ घेऊन, दुसर्या सुपात आठ मुठी 'सोमाय' या मंत्राने सावे घ्यावे, व पुन्हा पहिल्या 'द्यावा पृथिवी' देवतांसाठी तादूळ घ्यावे. याप्रमाणे होमाच्या ठिकाणी ही विश्वेदेवांचा होम झाल्यावर सोमदेवताक अशा श्यामाकचरूचा होम करून, नंतर द्यावापृथिवी देवतांचा होम करावा. आश्विनी पुनवेला अपराह्ण वगैरे संधीत जे आग्रयण करायचे ते आश्वयुजी कर्मासह समानतंत्राने करावे. त्याचप्रमाणे जुन्या व नव्या तांदुळाचे भात आणि साव्यांचा भात असे तीन चरु स्वतंत्र तीन भांड्यात करावे. पुनवेला जर पूर्वाह्णादि संधि असेल तर संधिदिवशी प्रकृतियाग केल्यावर आश्वयुजी कर्म करून पूर्वदिवशी किंवा संधिदिवशी प्रकृतियागाच्या आधी आग्रयण करावे. याप्रमाणे दोन कर्मांचे निरनिराळे दोन काळ असल्याने दोनेहे कर्मे एकाच तंत्रान करू नयेत. साव्यांचा भात जर मिळणार नाही, तर साव्यांचे एक मूठ गवत स्रुक्पात्राच्या उत्तरेकडे अंथरून त्यावर स्रुचि पात्र ठेवावे. म्हाजे श्यामाकाग्रयणाची सिद्धि होते, असे वृत्तिकार नारायण म्हणतो. यवांचे आग्रयण करावे. अथवा करू नये. व्रीह्याग्रयणांचा गौणकाळ वसंतऋतूपर्यंत आहे. यवाग्रयणाचा गौणकाल वर्षाऋतूपर्यंत आहे. कोणतीही अडचण नसता गौणकाली जर आग्रयण केले, तर मुख्य काळाचे उल्लंघन झाल्याचे प्रायश्चित्त करून मग आग्रयण करावे. आपत्तिकाळ असता गौणकाली आग्रयण करायला प्रायश्चित्त नको. गौणकालाचेही जर उल्लंघन झाले तर वैश्वानरेष्टिरूप प्रायश्चित्त करून, राहिलेले आग्रयण करावे. स्मार्ताग्नीसाठी वैश्वानरदेवताक स्थालीपाक (भात घ्यावा). याचे कारण असे की, 'अग्निहोत्र्याचे जे पुरोडाश तेच स्मार्ताग्निवंताचे चरु होत' असे वचन आहे. पहिल्यांदाच जे आग्रयण करायाचे, ते शरदऋतूंत करावे. त्या ऋतूंत जर न होईल, तर विभ्रष्ट इष्टि अथवा तद्देवताक स्थालीपाक करून, पुढे येणार्या मुख्य वेळी पहिले आग्रयण करावे. पहिले आग्रयण गौणकाली करू नये. दर्शपौर्णमास, आग्रयण वगैरेचे प्रायश्चित्त, त्यांचा आरंभ जर पूर्वी केला नसेल तर विकल्पेकरून करावे असे असल्याने विभ्रष्ट इष्टि देखील वैकल्पिकच समजावी. आग्रयण केल्यांवाचून कोणचेही नवे धान्य खाऊ नये. 'आग्रयणांवाचून जर कोणी नवे धान्य भक्षण केले, तर त्याने वैश्वानर देवतेसाठी चरु करावा अथवा पूर्णाहुति करावी. किंवा 'समिंद्ररया०' या मंत्राचा शंभर वेळा जप करावा.