देशकालादिकांचा उच्चार केल्यावर,
'समुद्रमेखलायाः पृथ्व्याः सम्यक् दानफलकामोहमर्धोदयविहितामत्रदानं करिष्ये'
असा संकल्प करावा. आणि सारवलेल्या जमिनीवर धुतलेल्या तांदुळाचा अष्टदळ कमळ काढून, त्यावर चौसष्ट अथवा चाळीस किंवा पंचवीस पले वजनाचे काशाचे भांडे अग्न्युत्तारण करून (विस्तवावर शेकून) ठेवावे. आठ गुंजाचा एक मासा, चाळीस मासे म्हणजे एक कर्ष, व चार कर्षांचे एक पल (असे कोष्टक असून) अमरसिंहाच्या मताने ऐशी गुंजांचा एक कर्ष व चार कर्ष म्हणजे एक पल (असे आहे). कांशाच्या भांड्यात खीर, (पायस) ठेवून, त्यांत अष्टदल काढावे, आणि त्याच्या कर्णिकेत एक कर्ष अथवा अर्धा कर्ष किंवा पाव कर्ष यापैकी कोणच्या तरी एका प्रमाणाचे सुवर्णलिंग करून ठेवावे. कांशाच्या भांड्यात ब्रह्मदेव, खिरीत विष्णु लिंगात शिव यांची-अधिकाराप्रमाणे वैदिक मंत्रांनी किंवा नाममंत्रांनी आवाहनादि उपचारांसह पूजा करावी, आणि नंतर ब्राह्मणाची वस्त्रादिकांनी पूजा केल्यावर
'सुवर्णपायसा मत्रं यस्मादेतत्त्रयीमयम् ।
आवयोस्तारकं यस्मात्तत्गृहाण द्विजोत्तम ॥
अमुकगोत्रायामुक शर्मणे तुभ्यं इदं सुवर्णलिंगपायसयुक्तममत्रं समुद्रमेखळापृथ्वीदानफलकामोहं संप्रददे नमः'
असे म्हणावे व ब्राह्मणाच्या हातावर पाणी सोडून दान करावे. ब्राह्मणाने 'देवस्य त्वा०' हा मंत्र म्हणून ते दान घ्यावे. दान देणाराने दानाच्या पूर्णत्वासाठी
'इमां दक्षिणां संप्रददे' असे म्हणून यथाशक्ति सुवर्ण द्यावे. हेमाद्रि वगैरे ग्रंथात अर्धोदयव्रताचा जो प्रयोग सांगितला आहे, त्यांत ब्रह्मादिकांच्या नावाने तिळाच्या तीन राशी, तीन शय्या व तीन गाई यांचे दान व होमादि करण्यास सांगितले असल्याने तो प्रयोग कौस्तुभात पाहावा. याप्रमाणे श्रीमदन्तोपाध्यायांचे पुत्र जे काशीनाथोपाध्याय त्यांनी रचलेल्या धर्मसिंधुसारातल्या पौषाच्या महिन्यातल्या कृत्यांच्या निर्णयाचा उद्देश येथे संपला.