मिथुनसंक्रान्तीच्या पुढच्या सोळा घटका पुण्यकाल असतो. रात्रीबद्दलचा निर्णय पूर्वींच सांगितला आहे. ज्येष्ठ महिन्यांत ब्रह्मदेवाची पिठाची मूर्ति करुन, तिची वस्त्रादिकांनीं पूजा केल्यास सूर्यलोकाची प्राप्ति होते. या महिन्यांत पाणी व गाय यांचें दान करावें. ज्येष्ठशुद्ध प्रतिपदेला करवीर व्रत करावें. ज्येष्ठ शुद्ध तृतीयेला रंभाव्रत करावें. या व्रताकरितां जी तृतीया पूर्वविद्धा असेल ती घ्यावी. ज्या कार्याकरितां पूर्वविद्धा तृतीया घ्यावी असें सांगितलें आहे, त्या ठिकाणीं, सूर्यास्ताच्या आधीं सहा घटकांपेक्षां अधिक व्याप्ति असणारी जी तिथि ती पूर्वविद्धा आहे असें समजावें. सहा घटकांपेक्षां कमी असल्यास अग्राह्य समजावी; असें जरी आहे, तरी दुसर्या दिवशीं जर सूर्यास्तापर्यंत पूर्वविद्धा तिथीची व्याप्ति असेल, तर पूर्वविद्धातिथी घ्यावी असें वचन आहे. तरी पण पूर्वविद्धा सोडून अखंड व शुद्धा अशी दुसर्या दिवसाचीच ग्राह्य होय. ग्राह्य अशा पूर्वविद्धा तिथीच्या पहिल्या दिवशीं जेव्हां सहा घटकांपेक्षां कमी व्याप्ति असेल, तेव्हां सुद्धां दुसर्या दिवसाचीच तिथि ग्राह्य होय, असा सर्वत्र निर्णय जाणावा. पञ्चाग्निसाधन करणारा पुरुष अथवा स्त्री यांनीं रम्भाव्रतांत भवानीची सोन्याची मूर्ति करुन, तिची पूजा करावी. तद्वतच होमादि यथाविधि करुन, बायको असलेल्या ब्राह्मणाला सर्व सामुग्रीसह घराचें दान द्यावें व दंपत्यांना जेवूं घालावें. याचा विशेष विधि, व्रतांच्या माहितीच्या ग्रंथांत पाहावा. ज्येष्ठशुद्ध चतुर्थीला पार्वतीचा अवतार झाला, म्हणून त्या दिवशीं उमापूजनाचें व्रत करावें. अष्टमीला शुक्लादेवीची पूजा करावी. नवमीला उपास करुन देवीची पूजा करावी.