भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सिद्धिविनायकव्रत करावे. चतुर्थी जर मध्याह्नव्यापिनी असेल तर ती घ्यावी. दोन दिवस जर सारखिच मध्याह्नव्यापिनी असेल अथवा दोन्ही दिवशी तशी नसेल, तर पूर्व दिवसाची घ्यावी. दोन दिवस जर समान अथवा विषम एकदेशव्याप्ति असेल, तर तशा वेळीही पूर्वदिवसाचीच घ्यावी. विषम म्हणजे जेव्हा कमी अधिक व्याप्ति असेल, तेव्हा जर दुसर्या दिवशी अधिक व्याप्ति असेल तर ती घ्यावी असे काही ग्रंथकारांचे मत आहे. पूर्वदिवशी जर मध्याह्नस्पर्श मुळीच नसेल आणि दुसर्या दिवशीच मध्याह्नस्पर्श असेल, तर दुसर्या दिवसाचीच घ्यावी. पूर्वदिवशी एकदेशाने मध्याह्नव्याप्ति आणि दुसर्या दिवशी संपूर्ण मध्याह्नव्याप्ति अशी जेव्हा स्थिति असेल, तेव्हाही दुसर्याच दिवसाची घ्यावी. इतर महिन्यांतही हाच निर्णय जाणावा. ही चतुर्थी जर रविवारी व मंगळवारी येईल, तर तो योग चांगला समजावा.