एक वर्षाची कन्या पूजेला वर्ज्य करावी. दोन वर्षाच्या कन्येपासून दहा वर्षांच्या कन्येपर्यंत कुमारीपूजन करावे. दोन वर्षाची कुमारी ती कुमारिका, तीन वर्षांची त्रिमूर्ति, चार वर्षांची कल्याणी, पांच वर्षांची रोहिणी, सहा वर्षांची काली, सात वर्षांची चंडिका, आठ वर्षांची शांभवी, नऊ वर्षांची दुर्गा व दहा वर्षांची भद्रा- याप्रमाणे कुमारींची नावे जाणावी. या कुमारीच्या प्रत्येकीच्या पूजेचे मंत्र, फलविशेष, लक्षणे वगैरे अन्य ग्रंथी पाहावीत. ब्राह्मणाने ब्राह्मणी कुमारीची पूजा करावी. याप्रमाणे याप्रमाणे सवर्णा कुमारीच प्रशस्त आहे. कामनाविशेषाप्रमाणे विजातीय कुमारीचीहि पूजा करावी असे क्वचित् सांगितले आहे. दररोज एकेक अधिक अथवा रोज एक याप्रमाणे कुमारीची पूजा करावी.
'मन्त्राक्षरमयी लक्ष्मी मातृणां रूपधारिणीम् ।
नवदुर्गात्मिकां साक्षात्कन्यायावाहयाम्यहम् ॥
जगत्पूज्ये जगद्वंद्ये सर्वशक्तिस्वरूपिणि ।
पूजां गृहाण कौमारी जगन्मातर्नमोस्तुते ते ॥'
या मंत्राने पादप्रक्षालनपूर्वक वस्त्र, कुंकुम, गंध, धूप, दीप, भोजन, यांनी पूजा करावी, असा संक्षेप जाणावा. कुमारीपूजेप्रमाणे देवीपूजा व चंडीपाठ हीही दररोज एक अधिक याप्रमाणे करावी. भवानीसहस्त्रनामाचाही पाठ करावा असे क्वचित ग्रंथी सांगितले आहे. हा शरदऋतूतील नवरात्रोत्सव मलमासात निषिद्ध आहे. हा शुक्रास्त असता होतो. प्रथमारंभ मात्र शुक्रास्तादिकांत करू नये. मृताशौच व जननाशौच असतां, घटस्थापनेपासूनचा सर्व विधि ब्राह्मणाकडून करवावा. आरंभ केल्यानंतर मध्यंतरी जरी अशौच आले तरी स्वतःच अखेरपर्यंतचा सर्व विधि करावा असे कोणी ग्रंथकार म्हणतात; परंतु अशौचात- पूजा, देवतास्पर्श वगैरे केली असता, लोकनिंदेला पात्र व्हावे लागते, यासाठी दुसर्याकडून करवितात. तृतीया, पंचमी, सप्तमी वगैरे तिथींवर नवरात्राचा आरंभ करावा असे जे गौणपक्ष सांगितले आहेत, त्यांचा आश्रय करून प्रतिपदेला अशौच असेल तर, तृतीयेपासून आरंभ करावा. तृतीयेला अशौच असल्यास पंचमीपासून आरंभ करावा. याप्रमाणे संभव असेल तसा गौणपक्ष स्वीकारून, दुसरे कोणी नवरात्र करतात व सर्वथा लोप होत असल्यास ब्राह्मणाकडून करवितात. उपवासादि शारीरिक नियम स्वतः पाळावे. रजस्वलेने देखील याप्रमाणेच उपवासादिक स्वतः करून, पूजादिक दुसर्यांकडून करवावे. नवरात्रांत सौभाग्यवती स्त्रियांना उपवासाच्या दिवशी, गंधतांबूलादिकांबद्दल दोष नाही असे सांगतात.