चैत्रशुद्ध प्रतिपदेला वर्षाचा जो आरंभ होतो; त्या बाबतींत सूर्योदयकाळीं जी प्रतिपदा असेल तीच ग्राह्य होय. उदयकालीं दोन दिवस व्याप्ति असेल अथवा दोन्ही दिवशीं नसेल, तेव्हां पहिल्या दिवसाचीच प्रतिपदा घ्यावी. चैत्रमहिना जर अधिक आला, तर नव्या वर्षाच्या आरंभानिमित्त तैलाभ्यंग व संकल्पादिकांमध्यें नव्या वर्षाच्या नांवाचा जो उच्चार करावयाचा, तें सर्व अधिक महिन्याच्या प्रतिपदेलाच करावें. प्रत्येकानें आपापल्या घरीं गुढया उभाराव्या, कडुलिंबाचीं पानें खावीं, वर्षफल ऐकावें, नवरात्राला आरंभ करावा आणि नवरात्राच्या उत्सवादिकांच्या संबंधानें संकल्पादिक जीं कर्में करायचीं, तीं सर्व शुद्ध महिन्याच्या प्रतिपदेला करावींत. नवीन वर्षाच्या आरंभाबद्दल जें तैलाभ्यंग करायचें, तें शुद्धमासाच्या प्रतिपदेलाच करावें असें मयूखांत सांगितलें आहे. या प्रतिपदेला तैलाभ्यंग करणें हें नित्यकर्म आहे. तें जर न केलें तर दोष सांगितला आहे. याच प्रतिपदेला देवीच्या नवरात्राचा आरंभ करावा. नवरात्राला जी प्रतिपदा घ्यायची, ती द्वितीयेनें एक मुहूर्तमात्र व्याप्त असलेली घ्यावी. या ठिकाणीं मुहूर्तमात्राचें प्रमाण येणेंप्रमाणें:-दिवसाचा अथवा रात्रीचा कोणचाही पंधरावा जो भाग तो मुहूर्त होय. मुहूर्ताबद्दलचें प्रमाण सर्व ठिकाणीं हेंच समजावें. या नवरात्रादिकांच्या पारणांचा विशेष निर्णय शरदृतूंतल्या नवरात्राप्रमाणेंच समजावा. प्रपादानाचा आरंभ याच दिवशीं करावा. प्रपादानमंत्र --
’प्रपेयं सर्वसामान्या भूतेभ्यः प्रतिपादिता ।
अस्याः प्रदानात्पितरस्तुष्यन्तु हि पितामहाः ॥’
यानंतर चार महिनेपर्यंत सर्वांना यथेच्छ जलदान करावें. प्रपा म्हणजे पाणपोई, ती घालण्याचें सामर्थ्य नसल्यास दररोज पाण्यानें भरलेला कुंभ (मातीचं भांडें) ब्राह्मणाच्या घरीं नेऊन द्यावें. त्या कृत्याचा मंत्र -
’एष धर्मघटो दत्तो ब्रह्मविष्णुशिवात्मकः ।
अस्य प्रदानात्सकला ममसन्तु मनोरथाः ॥’
याच प्रतिपदेला कल्पाचासुद्धां आरंभ होतो. याचप्रमाणें वैशाख शुद्ध तृतीया, फाल्गुन वद्य तृतीया, चैत्र शुद्ध पंचमी, माघ शुद्ध त्रयोदशी, कार्तिक शुद्ध सप्तमी आणि मार्गशीर्ष शुद्ध नवमी-या तिथिदेखील कल्पादिच होत. या तिथींवर श्राध्दें केलीं असतां पितरांची तृप्ति होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा ही मत्स्यजयन्ति आहे असें कोणी म्हणतात. चैत्रांत-दहीं, दूध, तूप व मध - हीं वर्ज्य करुन, दांपत्यपूजात्मक गौरीचें व्रत करावें. चैत्र शुद्ध द्वितीयेला संध्याकाळीं बालेन्दुपूजनात्मक चंद्रव्रत करावें. याच दिवशीं गौरीशिवांचें दवण्यानें पूजन करावें. चैत्र शुद्ध तृतीयेला शिवासह गौरीचें पूजन करुन एक महिनाभर आन्दोलनव्रत (झोंपाळ्यावर गौर बसविण्याचें) करावें. याला जी तृतीया घ्यायची ती, दुसर्या दिवसाची एक मुहूर्तभर जरी असली तरी घ्यावी. द्वितीयायुक्त घेऊं नये. चतुर्थीसह तृतीया जरी वैधृति वगैरे योगाची असली तरी तीच घ्यावी, कारण द्वितीयेसह तृतीयेचा फारच मोठा निषेध सांगितला आहे. याच तृतीयेला श्रीरामचंद्राच्या दोलोत्सवाचा आरंभ करुन तो उत्सव एक महिनाभर पूजापूर्वक करावा. इतर देवतांचेंहि याप्रमाणें करावें. हीच तृतीया मन्वादि देखील असल्यानें, येथेंच मन्वादि तिथींचा निर्णय सांगतों. चैत्रशुद्ध तृतीया व पौर्णिमा, ज्येष्ठी पौर्णिमा, आषाढ शुद्ध दशमी व पौर्णिमा, श्रावण वद्य अष्टमी, भाद्रपद शुद्ध तृतीया, आश्विन शुद्ध नवमी, कार्तिक शुद्ध द्वादशी व पौर्णिमा, पौष शुद्ध एकादशी, माघ शुद्ध सप्तमी व फाल्गुनी पौर्णिमा आणि अमावस्या या चौदा तिथि मन्वादि होत. यांतल्या शुक्लपक्षांतल्या असतील त्या, देवकर्में आणि पितृकर्में यांना घ्याव्या. येथें पूर्वाह्न याचा अर्थ दिवसाच्या बरोबर दोन भागांपैकीं पहिला भाग असा आहे. अशा पूर्वाह्नींच श्राध्द करण्यास सांगितलें आहे. देवाच्या बाबतींत अथवा मनुष्याच्या बाबतींत जर कांहीं अडचणीमुळें पूर्वाह्नीं श्राद्ध करणें अशक्य असेल, तर अपराह्न काळीं तें करावें. दिवसाच्या पूर्वाह्नकाळीं, निदान अपराण्हकाळीं तरी श्राद्धादिक करावें. याचा अर्थ असा कीं, दिवसाच्या उत्तरार्धाच्या मध्यभागीं करुं नये. ज्या मन्वादि तिथि कृष्णपक्षांतल्या असतील त्यांच्या दिवसांचे समसमान असे पांच भाग करुन, त्यांपैकीं चौथ्या म्हणजे अपराह्नकाळांत ज्यांची व्याप्ति असेल अशा-देव आणि पितर यांच्या कर्मांसंबंधानें घ्याव्या. मन्वादि तिथींवरचें श्राद्ध पिंडांवांचून करावें. या तिथींवर श्राद्ध केल्यानें, दोन हजार वर्षेंपर्यंत पितर तृप्त राहतात. मन्वादि श्राद्ध नित्य असल्यानें, तें न केल्यास ’त्वं भुवः प्रतिमानं’ या ऋचेचा शंभर वेळ जप पाण्यांत उभें राहून करावा, असें त्याबद्दलचें प्रायश्चित सांगितलें आहे. याचप्रमाणें षण्णवती श्राद्धेंहि जीं आहेत, तीं येणेंप्रमाणें:---अमावास्येचीं १२, युगादि ४, मन्वादि १४, संक्रांति १२, वैधृती १९, व्यतिपात १५, महालय १५, अष्टका ५, अन्वष्टका ५ आणि पूर्वेद्यु ५, अशीं हीं एकंदर ९६ समजावींत.