गूळ खाणे सोडल्यास स्वर मधुर होतो. तेल सोडल्यास अंगकान्ति सुंदर होते. योगाभ्यासाने ब्रह्मप्राप्तहोते. विडा खाणे सोडल्यास भोगप्राप्ति होते व कंठ गोड होतो. तूप सोडल्यास शरीर मऊ होते. पालेभाजी सोडल्यास पक्वान्न मिळते. पायांना अभ्यंग लावणे सोडल्यास अंगाला सुगंध येतो. दही, दूध व ताक ही वर्ज्य केल्यास विष्णुलोक मिळतो. थाळ्यात शिजविलेले अन्न सोडल्यास वंश वाढतो. जमिनीवर दर्भ अंथरून त्यावर निजल्यास विष्णुभक्त होतो. जमिनीवर जेवल्याने राज्य मिळते. मधु (सुरा) व मांस यांचा त्याग केल्याने मुनिपणा येतो. एकदिवसाड जेवण केल्याने ब्रह्मलोक मिळतो. नखे व केस राखल्याने रोज गंगास्नानाचे फळ मिळते. मुकेपणा राखल्याने आज्ञाभंग होत नाही. विष्णूला नमस्कार केल्याने गोदानाचे फळ मिळते. विष्णूच्या पायांना स्पर्श करणारा कृतकृत्य होतो. विष्णूच्या देवळात सडासंमार्जन केल्याने राजेपणा मिळतो. शंभर प्रदक्षिणांनी विष्णुलोक मिळतो. एकवेळ जेवल्याने अग्निहोत्राचे फळ मिळते. अयाचित भोजनाने विहीर व गुहा यांची स्वच्छता केल्याचे फळ मिळते. दिवसाच्या सहाव्या भागात जेवण केल्यास अक्षय स्वर्ग मिळतो. पानावर जेवण केल्याने कुरुक्षेत्री राहिल्याचे फळ मिळते. दगडाच्या चिपेवर जेवण केल्याने प्रयागस्नानाचे फळ मिळते. याप्रमाणे चार महिनेपर्यंत करण्यास कठीण नसलेल्या (साध्य) व्रतांचा संकल्प, एकादशीला अथवा द्वादशीला करून, त्याच दिवशी श्रावणातल्या विशेषव्रतांचा संकल्प पुढील प्रमाणे करावा-
'अहंशाकं वर्जयिष्ये श्रावणे मासि माधव' वगैरे. या ठिकाणी शाक या शब्दाचा अर्थ- फळ, मूळ, पुष्प, पान, अंकुर, कांड, साली वगैरे जो लोकप्रसिद्ध तोच घ्यायचा. केवळ तोंडी लावण्याच्या ज्या भाज्या त्याच असा संकुचित अर्थ 'शाक' या शब्दाचा येथे घ्यायचा नाही; म्हणून वरील सर्व वस्तु वर्ज्य कराव्या. सुंठ, हळद, जिरे वगैरेहि वर्ज्यच होत. त्या काळात उत्पन्न झालेल्या अथवा पूर्वी उत्पन्न होऊन वाळवून ठेवलेल्या सर्व भाज्या (शाका) वर्ज्य कराव्या. या चातुर्मास्यव्रतांची समाप्ति झाल्यावर, कार्तिकी पुनवेला जी दाने द्यायची, ती त्या प्रकरणांत सांगण्यात येतील.