सिंहसंक्रान्तीच्या आधीच्या सोळा घटका पुण्यकाळ. संक्रमण जर रात्री होत असेल तर त्याबद्दलचा निर्णय आधीच सांगितलेला आहे. या महिन्यात एकवेळ जेवणाचे व्रत, नक्तव्रत, आणि विष्णु व शंकर यांवर अभिषेक ही कार्ये करावीत, असे सांगितले आहे. सिंहराशीला सूर्य गेला असता ज्याची गाय विते, त्याने व्याह्रतिमंत्राने, तुपात भिजवलेल्या मोहर्यांचा दहाहजार होम करून ती गाय ब्राह्मणाला द्यावी. याप्रमाणेच मध्यरात्री गाय ओरडली असताही मृत्युंजयाच्या मंत्राने होमादिरूप शान्ति करावी. श्रावणमासात दिवसा घोडी प्रसवणे ही गोष्ट याप्रमाणेच निषिद्ध आहे. माघात अथवा बुधवारी म्हैस, श्रावणात दिवसा गोडी आणि सिंहसंर्कांतीत गाय यांची जर प्रसूति (विणे) होईल तर त्यांचा मालक मृत्यु पावतो, असे वचन आहे; यासाठी तसे झाल्यास शान्ति करावी. शान्तीबद्दल शान्तिग्रंथात पाहावे. श्रावणांत यथाविधि सोमवारव्रत करावे. शक्ति असेल त्याने (सोमवारी) उपास करावा अथवा रात्री जेवावे. श्रावणात याचप्रमाणे मंगळवारी गौरीची पूजा करण्यास सांगितले आहे. जी श्रावण शुद्ध चतुर्थी मध्याह्नव्यापिनी अशा तृतीयेने युक्त असेल ती या व्रताला घ्यावी. श्रावणशुद्ध पंचमी ही नागपंचमी होय. सूर्योदयापासून तीन मुहूर्तपर्यंत व्यापिनी आणि षष्ठीने विद्ध अशी जी असेल ती या कामाकरिता घ्यावी. दुसर्या दिवशी तीन मुहूर्ताहून कमी पंचमी आणि आदल्या दिवशी तीन मुहूर्ताहून अधिक अशी चतुर्थीने जर (पंचमी) विद्ध असेल, तर ती ग्राह्य नाही असे मला वाटते. या पंचमीला भिंतीवर काढलेल्या अथवा मातीच्या केलेल्या जसा परिपाठ असेल त्याप्रमाणे नागांची पूजा करावी. श्रावणशुद्ध द्वादशीला
'मांस कृतस्य शाकवर्जनव्रतस्य साङ्गतार्थ ब्राह्मणाय शाकदानं करिष्ये'
असा संकल्प करून ब्राह्मणाची पूजा करावी आणि नंतर
'उपायनमिदंदेव व्रतसंपूर्णहेतवे । शाकंतु द्विजवर्जाय सहिरण्यं ददाम्यहम् ॥'
मंत्राने पिकलेली अथवा हिरवी शाक द्यावी. शाक दिल्यानंतर
'दधि भाद्रपदे मासे वर्जयिष्ये सदा हरे'
असा भाद्रपदांत दही सोडण्याचा संकल्प करावा. अशा प्रसंगी दही तेवढेच वर्ज्य समजून, ताक वगैरेंचा निषेध नाही असे समजावे. नंतर पारण्याच्या दिवशी द्वादशीला विष्णूला पोवते (पवित्रारोपण) घालावे. पारण्याला जर द्वादशी नसेल, तर त्रयोदशीला पारण्याच्या वेळी, आणि तेव्हाहि अशक्य असल्यास पुनवेला अथवा श्रवण नक्षत्र असता पोवते घालावे. शिवाचे पोवते-चतुर्दशी, अष्टमी अथवा पुनव-यातल्या कोणच्याहि तिथीला करावे. याचप्रमाणे- देवी, गणपति, दुर्गा वगैरेंची पोवती-चतुर्थी, तृतीया, नवमी वगैरे तिथींवर कुलाचाराप्रमाणे करावीत. ही पोवती योग्य तिथीवर करणे अशक्य झाल्यास, सर्व देवांची पोवती श्रावणी पुनवेला एकाच तिथीवर करावीत. तेव्हाहि करणे अशक्य झाल्यास कार्तिकी पुनवेपर्यंतचा काल गौण आहे. ही पोवती करणे तर अवश्य असल्याने, ती न केल्यास अधोगति प्राप्त होते आणि वर्षभर केलेली पूजा व्यर्थ जाते, अशी वचने आहेत. गौणकालातहि करणे न झाल्यास एकाग्र मनाने मंत्राचा दहाहजार जप करावा असे वचन आहे; यास्तव, त्या त्या देवतेच्या मूलमंत्राचा दहा हजार जप करण्याचे प्रायश्चित्त करावे. आदल्या दिवशी अधिवासन करून, दुसर्या दिवशी पोवते घालावे. त्याप्रमाणे दोन दिवस करणे अशक्य झाल्यास एकाच दिवशी- आधी अधिवासन करून मग पोवते घालावे.