ऋग्वेद्यांनी श्रावणशुद्ध पक्षात -श्रवण नक्षत्र, पंचमी आणि हस्तनक्षत्र असे जे तीन काल सांगितले आहेत, त्यात श्रवणनक्षत्र हा जो मुख्य काल, तो जर न साधेल तर पञ्चमी (तिथि) किंवा तीही न साधल्यास हस्तनक्षत्र, (अशी योजना जाणावी). कालतत्त्वविवेचन नावाच्या ग्रंथातल्या संग्रहकारिकेत असे सांगितले आहे की, ग्रहण व संक्रान्ति यांनी दूषित नसलेली अशी पुनव आणि श्रवण नक्षत्र यावर अनुक्रमे यजुर्वेदी व ऋग्वेदी यांनी उपाकर्म करावे. कदाचित त्यांचाहि संभव नसल्यास, त्याच पक्षात हस्तनक्षत्रयुक्त पंचमीलाअथवा हस्त नक्षत्र अगर पंचमी यापैकी कोणचाही योग असल्यास (उपाकर्म) करावे. श्रवण नक्षत्र जर दोन दिवस असेल तर, म्हणजे आदल्या दिवशी, सूर्योदयापासून आरंभ होऊन दुसर्या दिवशी सूर्योदयानंतर सहा घटका जर असेल, तर दुसर्या दिवशीच उपाकर्म करावे; कारण, धनिष्ठायोग या कर्माला प्रशस्त असल्याचे सांगितले आहे. दुसर्या दिवशी जर श्रवण नक्षत्र सहा घटकांहून कमी असेल, तर पहिलाच दिवस योग्य होय; कारण, त्या दिवशी पूर्ण व्याप्ति आहे. पूर्व दिवशी सूर्योदयाच्या वेळी श्रवण नक्षत्र नसून, सूर्योदयानंतर जर ते चार घटका असेल, तर दुसर्या दिवशीच करावे. उत्तराषाढांच्या वेधाचा जो निषेध सांगितला आहे, त्याचे हे कारण होय. दुसर्या दिवशी जर श्रवण नक्षत्र चार घटकांहून कमी नसेल, आणि आदल्या दिवशी जर ते उत्तराषाढा नक्षत्राने विद्ध असेल, तर पंचमी आणि हस्तनक्षत्र हे दोन काळ, उदयकाळ जेव्हा सहा घटका व्याप्ति असेल, तेव्हा मुख्य जाणावेत. तसे जर नसतील तर पूर्वविद्ध घ्यावेत. याप्रमाणेच भाद्रपद शुद्ध पक्षातही श्रवण नक्षत्र, पंचमी आणि हस्तनक्षत्र यांचे कालनिर्णय जाणावेत. हे उपाकर्म ऋग्वेद्यांनी पूर्वाह्णकाळी करावे.