जाई जुई वगैरेंच्या फुलांनी भगवन्ताची महापूजा करून,
'सुप्ते त्वयि जगन्नाथे जगत्सुप्तं भवेदिदम् । विबुद्धे त्वयि बुध्येत प्रसन्नोमे भवाच्युत॥
अशी प्रार्थना करावी आणि विष्णूच्या पुढे हात जोडून उभे राहून
'चतुरो वार्षिकाम् मासान् देवस्योत्थापनाविधि । श्रावणे वर्जये शाकं दधि भाद्रपदे तथा ॥
दुग्धमाश्वयुजेमासि कार्तिके द्विदलं तथा । इम करिष्ये नियमं निर्विघ्नं कुरु मेऽच्युत ॥
इदं व्रतं मया देव गृहीतं पुरातस्तव । निर्विघ्नं सिद्धिमायातु प्रसादात्ते रमापते ॥
गृहीतेऽस्मिन्व्रते देवं पंचत्वं यदि ये भवेत् । तदा भवतु सम्पूर्णं प्रसादात्ते जनार्दन ॥'
या मंत्रानी प्रार्थना करावी व देवाला शंखांनी अर्घ्य द्यावे. या मंत्रात सांगितलेली जी श्रावणात पालेभाजी वर्ज्य, भाद्रपदात दही वर्ज्य, आश्विनात दूध वर्ज्य व कार्तिकात द्विदलधान्य वर्ज्य - ही व्रते ती नित्य आहेत. हविष्यादि इतर व्रते करण्याची जर इच्छा असेल, तर 'श्रावणे वर्जये शाकं' वगैरे श्लोकांच्या जागी 'हविष्यान्न भक्षयिष्ये देवाहं प्रीतये तव।'
असा श्लोक म्हणावा. शाकव्रत आणि इतर व्रते जर एकदमच करण्याची इच्छा असेल, तर शाकव्रताचा मंत्र म्हणून, इतर व्रतांचाही म्हणावा. त्याचप्रमाणे जर गूळ सोडायचा असेल व धारणा पारणा करणे असेल तर त्याबाबतीत पुढीलप्रमाणे उच्चार करावा -
'वर्जयिष्ये गुडं देव मधुरस्वरसिद्ध्ये । वर्जयिष्ये तैलमहं सुंदरांगत्वसिद्धये ॥
योग्याभ्यासी भविष्यामि प्राप्तंब्रह्मपदंपरम् । मौनव्रती भविष्यामि स्वाज्ञापालनसिद्धये ॥
एकान्तरोपवासीच प्राप्तुं ब्रह्मपदं परम् ॥'
सर्वच निषिद्ध पदार्थ जर वर्ज्य करायचे असतील, तर 'वृन्ताकादि निषिद्धानि हरे सर्वाणि वर्जये' असा संकल्प करावा.