त्यानंतर सत्कथा ऐकण्यात जागरण करण्यात रात्र घालवावी आणि सकाळी जर अधिवासन करायचे असेल, तर गाईची धार काढण्याच्यावेळी
'पवित्रारोपणाङ्गभूतं देवपूजनं पवित्रपूजनंच करिष्ये'
असा संकल्प करावा, आणि देव व पोवती यांची फलादि उपनैवेद्यापर्यंत गंधादि उपचारांनी पूजा करून गंध, दूर्वा व अक्षता यांसह कनिष्ठ पोवते घ्यावे व ते
'देव देव नमस्तुभ्यं गृहाणेदं पवित्रकम् । पवित्रीकरणार्थाय वर्षपूजाफलप्रदम् ॥
पवित्रकं कुरुष्वाद्य यन्मया दुष्कृतं कृतम् । शुद्धो भवाम्यहं देव त्वत्प्रसादात् सुरेश्वर ॥'
या मूलसंपुटित मंत्राने द्यावे. त्याचप्रमाणे मध्यम आणि उत्तम पोवती आणि वनमाला हीही प्रत्येकाला वरचा मंत्र प्रत्येक वेळी म्हणून, देवाला अर्पण करावीत. अंगदेवतांना फक्त त्यांची नावे घेऊनच अर्पण करावीत. त्यानंतर महानैवेद्य देऊन नीरांजन ओवाळावे व जी प्रार्थना करावी, ती अशीः-
'मणिविद्रुममालाभिर्मन्दारकुसुमादिभिः ।
इयं सांवत्सरी पूजा तवास्तु गरुडध्वज ॥
वनमाला यथा देव कौस्तुभं सततं ह्रदि ।
तद्वत्पवित्रतंतूंस्त्वं पूजांच ह्रदये वह ॥
जानताजानता वापि यत्कृतं न तवार्चनम् ।
केनचिद्विघ्नदोषेण परिपूर्णं तदस्तु मे ॥
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पूजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे ॥
अपराधसहस्त्राणि क्रियन्तेहर्निशं मया ।
दासोहमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर ॥'
जेव्हा शिवाची पोवती असतील तेव्हा वरील प्रार्थनेत 'गरुडध्वज' याबद्दल वृषवाहन' असे म्हणावे आणि 'वनमाला' हा श्लोक म्हणू नये. देवीची पोवती असतील तेव्हा 'देव देव सुरेश्वर' याच्या जागी 'देवि देवि सुरेश्वरी' असा स्त्रीप्रत्ययान्त पदांचा उच्चार करावा. बाकी सारे श्लोक सारखेच आहेत यानंतर गुरूंची पूजा करून त्यांना पोवते दिल्यावर, इतर ब्राह्मण व सुवासिनींनाही इतर पोवती द्यावीत व स्वतःही सर्व कुटुंबासह धारण करावीत. नंतर ब्राह्मणांसह जेवण करून तीन दिवसपर्यंत ब्रह्मचर्यादि नियम पाळावेत. देवाला पोवती वाहावीत. देवाची पोवती काढून, स्नानादि उपचारांनी देवाची पूजा करावी. तीन दिवस झाल्यावर देवाची पूजा करून, पोवती काढावीत. या ठिकाणी शिवाला जी पोवती वाहायची, त्याला जी चतुर्दशी त्रयोदशीने विद्ध असेल ती घ्यावी. याप्रमाणेच पुनव देखील तीन मुहूर्त सायाह्नकालव्यापिनी अशी पूर्वविद्धाच घ्यावी. अष्टम्यादि निराळ्या तिथि देखील ज्या पोवती वाहाण्याकरिता घेणे असतील त्या पहिल्या परिच्छेदात सांगितल्याप्रमाणे सामान्य तिथींच्या निर्णयाप्रमाणे घ्याव्या. याप्रमाणे पवित्रारोपणाचा विधि येथे संपला.