प्राण्यांच्या हाडांचा चुना, कातड्याच्या पिशवीतले पाणी, ईडनिंबू, महाळुंग, वैश्वदेव न झालेले अन्न, विष्णुला अर्पण न केलेले अन्न, करपलेले अन्न, मसुरा व मांस- ही आठ आमिषे आहेत, ती सर्व वर्ज्य करावीत. पांढरे पावटे, काळे वाल, घेवडा, चवळी, लोणची, वांगी, कलिंगड, पुष्कळ बीजांचे फळ, मुळीच बिया नसलेले फळ, तांबडा मुळा, पांढरा मुळा, कोहळा, ऊस, नवी बोरे, आवळे, चिंच, पलंगादिकांवर निजणे, ऋतुकालावाचून हवा तेव्हा स्त्रीसंग करणे, परान्न, मध, पडवळ, उडीद, हुलगे (कुळीथ) आणि पांढर्या मोहर्या ही सर्व वर्ज्य करावीत. वांगी, बेलफळे, उंबरे, कलिंगड व करपलेले अन्न- हे पदार्थ वैष्णवांनि अक्षयीच वर्ज्य करावेत. गाय, म्हैस व शेळी यांच्या दुधावाचून इतर प्राण्यांचे दूध, शिळे अन्न, ब्राह्मणापासून विकत घेतलेले रस, जमीनीपासून तयार झालेले मीठ, तांब्याच्या भांड्यातले गाईचे दूध, साचलेले पाणी, स्वतःकरताच केवळ तयार केलेले अन्न-हे सर्व पदार्थ आमिषगणात येतात असे इतर ग्रंथात सांगितले आहे. चातुर्मास्यांत हविष्यान्न खाणार्याला पाप लागत नाही. तांदूळ, मूग, यव, तीळ, कांग, राळे, वाटाणे, सांवे, गहू, पांढरा मुळा, सुरण, सैंधव, समुद्रापासून केलेले मीठ, गाईचे दही-दूध-तूप, फणस, आंबा, नारळ, हिरडा, पिंपळी, जिरे, सुंठ, चिंच, केळे, आवळे, राय आवळे (हरपररेवडी) गुळाखेरीज उसाचा इतर पदार्थ (साखर) ही सर्व तेलात जर तळलेली नसतील, तर हविष्ये जाणावीत. गाईचे ताक व म्हशीचे तूप हीही क्वचित ठिकाणी हविष्ये सांगितली आहेत.