द्वादशी व श्रवण या दोहोंच्या अंती पारणा करावी हा मुख्य पक्ष. दोहोंतून एकाच्या अंती पारणा करणे हा गौण पक्ष. विष्णु शृंखल योग नसेल तर दोहोंचे अंती त्रयोदशीचे दिवशी पारणा करावी. विष्णु शृंखल योग असेल तर पूर्वतंत्राने दोन उपवास ज्याने केले आहेत त्याने दुसर्या दिवशी श्रवण नक्षत्रापेक्षा द्वादशी अधिक असेल तर श्रवणाचे अंती द्वादशीमध्ये पारणा करावी. जर पारणेचे दिवशी द्वादशीपेक्षा श्रवण अधिक असेल तर, द्वादशीचे अंती एकादशी व्रताच्या पारणेविषयी दोष सांगितला आहे याकरिता द्वादशीमध्येच पारणा करावी. दोहोंतून एकाचा अंत होण्याची गरज नाही. जर संभव असेल तर श्रवणाचा २० घटिकात्मक मध्यभाग टाकून पारणा करावी. उदाहरण - एकादशी ३०, उत्तराषाढा २९, द्वादशी २५ व श्रवण २९. या ठिकाणी पूर्व दिवशी तंत्राने दोन उपवास करून दुसर्या दिवशी अवशिष्ट ९ घटिकात्मक श्रवणाचा मध्यभाग टाकून द्वादशीमध्ये शेवटच्या २० घटिकात्मक श्रवणभागामध्ये पारणा करावी. या सांगितलेल्या उदाहरणामध्येच एकादशी १० घटिका असेल व द्वादशी ८ घटिका असेल, अथवा द्वादशी १५ आणि श्रवण ४० घटिका असेल तर श्रवणाचे मध्यभागाचा त्याग केला असता द्वादशीचे उल्लंघन करण्याचा प्रसंग येतो यास्तव संगव काल सहाघटिकांपर्यंत अथवा सातवा मुहूर्त इत्यादि काली श्रवण नक्षत्राचे मध्यभागी भोजन करावे. हा मध्यभागाचा त्याग सांगितला तो भाद्रपदातील श्रवण द्वादशीव्रताविषयीच जाणावा. माघ, फाल्गुन या महिन्यातील कृष्णपक्षातील श्रवण द्वादशी व्रताच्या पारणेविषयी नाही. कारण भाद्रपद मासाहून इतर मासातील श्रवणनक्षत्राचे भागामध्ये विष्णूचे परिवर्तन नाही. जे भाद्रपद महिन्यात श्रवनाचा मध्यभाग मात्र वर्ज्य केल्याने निषेध पाळल्यासारखे मानतात व विष्णुशृंखल योगाचा अभाव असताही श्रवणाचा मध्यभाग मात्र टाकून भोजन करतात ते नित्य अशा श्रवण द्वादशी व्रताच्या माहात्म्याविषयी अनभिज्ञ अर्थात् भ्रान्त होत. हा सर्व निर्णय इतर मासांमधील श्रवण द्वादशी व्रताविषयीही समजावा. श्रवण द्वादशी व्रतामध्ये नदीच्या संगमावर स्नान करून कलशाचे ठिकाणी सुवर्णमय अशा जनार्दन नामक विष्णूच्या मूर्तीची पूजा करून वस्त्र, यज्ञोपवीत, उपानह, छत्र इत्यादि समर्पण करून उपवास करावा. पारणेचे दिवशी दहीभाताने युक्त, वस्त्राने वेष्टित व जलपूर्ण असा कलश आणि छत्रादिकांनी युक्त, पूजन केलेली व सर्व परिवारांसह अशी प्रतिमा यांचे दान करावे. दानाचा मंत्र -
"नमो नमस्ते गोविन्द बुध श्रवण संज्ञक । अघौघसंक्षयं कृत्वा सर्वसौख्यप्रदो भव ॥"