तृतीयेपासून नवमीपर्यंत सात दिवस नवरात्र करावे. पंचमीपासून नवमीपर्यंत पाच दिवस नवरात्र करावे. सप्तमीपासून नवमीपर्यंत तीन दिवस नवरात्र करावे. अष्टमीपासून नवमीपर्यंत दोन दिवस नवरात्र करावे. एकच दिवस जर नवरात्र करायचे असेल, तर केवळ अष्टमी अथवा नवमी या दोहोंपैकी एके दिवशी करावे. आपापल्या कुलाचाराप्रमाणे, अथवा प्रतिबंधामुळे पहिल्या पक्षाचा जर संभव नसेल, तर त्याप्रमाणे या पक्षाची व्यवस्था समजावी. यामध्ये तृतीया व पंचमी यांचा निर्णय सप्तमीप्रमाणे समजावा. सप्तमीचा निर्णय पुढे सांगेन. वर सांगितलेल्या पक्षाचे ठिकाणी जर तिथीचा क्षय अथवा वृद्धि यामुळे दिवसाचे आधिक्य अथवा न्यूनत्व जर होत असेल, तर पूजा इत्यादिकांची आवृत्ति म्हणजे (तिथीची वृद्धि असल्यास दोन्ही दिवशी एकेकदा पूजा करावी व क्षय असल्यास एकाच दिवशी दोनदा) पूजा करावी. कोणी कोणी क्षयाच्या दिवशी पूजा व चंडीपाठ ही आठाठदा करतात. हे देवीपूजनात्मक नवरात्र नित्य व काम्यही आहे. याचे कारण असे की, ते न केल्यास दोष सांगितला असून, केल्यास फल प्राप्ति सांगितली आहे.