मुख्य गोवर्धनपर्वत ज्यांना जवळ असेल त्यांनी त्याची पूजा करावी. ज्यांना त्या खर्या गोवर्धनाची पूजा करणे अशक्य असेल अशांनी गाईच्या शेणाचा अथवा भाताचा गोवर्धन करून, त्याच्यासह श्रीकृष्णाचे पूजन करावे. पूजा करताना,
'श्रीकृष्णप्रीत्यर्थ गोवर्धनपूजनं गोपालपूजनात्मकं महोत्सवं करिष्ये ।'
असा संकल्प करून,
'बलिराज्ञे द्वारपालो भवानद्य भवप्रभो । निजवाक्यार्थनार्थाय सगोवर्धन गोपते ॥
या मंत्राने गोवर्धनासह गोपालाचे आवाहन करून त्याची स्थापना करावी. नंतर
'गोपालमूर्ते विश्वेश शक्रोत्सव विभेदक । गोवर्धन कृतच्छत्र पूजां मे हर गोपते ॥
गोवर्धनधराधार गोकुलत्राणकारक । विष्णुबाहुकृतच्छाय गवां कोटिप्रदोभव ॥'
या मंत्रांनी गोपालासह गोवर्धनाची षोडशोपचारे पूजा करावी. आणि वैभवानुरूप महानैवेद्य द्यावा. त्यानंतर पूजेच्या अंगभूत अशा जिवंत अथवा मातीच्या गाईची वरील मंत्रांनी पूजा करून,
'आगावो अग्मन्प्रैते वदन्तु०' या दोन ऋचांनी घरात तयार केलेल्या भाताने होम करावा. नंतर ब्राह्मणांना अन्न व गाय वगैरेचे दान केल्यावर, गाईला गवत व गोवर्धनाला बलिदान ही अर्पण करावीत व शेवटी गाईसहवर्तमान आपण- गाई, ब्राह्मण व गोवर्धनगिरि यांना प्रदक्षिणा घालावी.