ज्येष्ठी पुनवेला वटसावित्रीव्रत असतें. या व्रतांत त्रयोदशीपासून तीन दिवस उपास करावा. तीन दिवस उपास करण्याची शक्ति नसल्यास त्रयोदशीला नक्त, चतुर्दशीला अयाचित आणि पुनवेला उपास याप्रमाणें करावींत. या व्रतांत जे तीन दिवस घ्यायचे ते पौर्णिमेच्या नियमानुसारानें त्रयोदशीपासून तीन दिवस घ्यावेत. सूर्यास्ताच्या पूर्वीं तीन मुहूर्त व्यापिनी व चतुर्दशीनें विद्ध असलेली पौर्णिमा या व्रताकरतां घ्यावी; तीन मुहूर्तांहून जर ती कमी असेल तर दुसर्या दिवसाची घ्यावी. पुनव जरी चतुर्दशीच्या अठरा घटकांनीं विद्ध झालेली असली, तरी ती सावित्रीव्रताला घ्यावी. ’चतुर्दशी अठरा घटकांनीं पुढच्या तिथीला दूषित करते’--असें जें वचन आहे, तें सावित्रीव्रताखेरीज इतर व्रतांना लागूं आहे असें समजावें. उपास न करतां फक्त पूजा करुनच सर्वत्र जें सावित्रीव्रत स्त्रिया करतात, त्याच्या व्रतदानाविषयीं चतुर्दशीचा अठरा घटका वेध आहे व उपास नाहीं, असा जो निर्णयसिंधूत माधवाचा अभिप्राय लिहिला आहे, त्याला अनुसरुन जर अठरा घटका चतुर्दशी असेल, तर पूजाव्रताला दुसर्या दिवसाची घ्यावी व उपासव्रताला मात्र पहिली घ्यावी असें मला वाटतें. या व्रताचें पारणें पुनवेच्या शेवटीं करावें. विटाळशीपणा वगैरे दोष असल्यास, पूजा वगैरे सर्व ब्राह्मणाकडून करवावें. उपास वगैरे स्वतः करण्याचे जे स्त्रीव्रताविषयीं आहेत, ते पहिल्या परिच्छेदांत सांगितल्याप्रमाणें समजावेत. व्रताची पूजा, उद्यापन वगैरे विधि व्रतग्रंथांत प्रसिद्ध आहेतच. ज्येष्ठी पुनवेला ज्येष्ठा नक्षत्रीं गुरु व चंद्र आणि रोहिणी नक्षत्रीं जेव्हां सूर्य असेल, तेव्हां महाज्येष्ठी पुनवेचा योग होतो. त्या दिवशीं स्नानदानादि करावींत. ही पुनव मन्वादि असल्यानें, तिच्या दिवशीं पिण्डांवांचून श्राद्ध करावें असें सांगितलें आहे. याचा निर्णय चैत्रमासप्रकरणांत सांगितला आहे. या ज्येष्ठमहिन्यांत-चंदन, पंखा, उदकुंभ वगैरे वस्तूंचीं दानें केलीं असतां त्रिविक्रम संतुष्ट होतो. याप्रमाणें अनंतोपाध्यायांचे पुत्र काशीनाथोपाध्याय यांनीं रचिलेल्या धर्मसिंधुसारांतला ज्येष्ठमास निर्णयाचा उद्देश येथें संपला.