त्रयोदशीला एक वेळ जेवावें. मध्याह्नीं तीळ व आंवळे वांटून अंगाला त्यांचें मिश्रण लावावें व स्नान करावें.
’उपोष्येहं नारसिंह भुक्तिमुक्तिफलप्रद ।
शरणं त्वां प्रपन्नोऽस्मि भक्तिं मे नृहरे दिश ॥’
या मंत्रानें व्रताचा संकल्प करुन, आचार्य पसंत करुन ठेवावा. संध्याकाळीं धान्याच्या (तान्दुळाच्या) राशीवर पाण्यानें भरलेला कलश ठेवून, त्यावर पूर्णपात्र ठेवावें. त्या पूर्णपात्रांत नृसिंहाची सोन्याची प्रतिमा ठेवून तिची पूजा करावी व अर्घ्य द्यावें. अर्घ्याचा मंत्र असा:-
परित्राणाय साधूनां जातो विष्णो नृकेसरी ।
गृहाणार्घ्यं मया दत्तं सलक्ष्मीर्नृहरिःस्वयम् ॥’
रात्रीं जागरण करुन सकाळीं देवाची पूजा करावी, आणि मग देवतेचें विसर्जन करावें. त्यानंतर आचार्याला त्या प्रतिमेचें दान गाईसकट करावें. दानमंत्र येणेंप्रमाणें :-
’नृसिंहाच्युत गोविंद लक्ष्मीकान्त जगत्पते ।
अनेनार्चाप्रदानेन सफलाःस्युर्मनोरथाः ॥’
त्यानंतर
’मद्वंशे ये नरा जाता ये जनिष्यन्ति चापरे ।
तांस्त्वमुद्धर देवेश दुःसहाद्भवसागरात् ॥
पातकार्णवमग्नस्य व्याधिदुःखाम्बुवारिधेः ।
नीचैश्व परिभूतस्य महादुःखागतस्य मे ॥
करावलंबनं देहि शेषशायिन् जगत्पते ।
श्रीनृसिंह रमाकान्त भक्तांना भयनाशन ॥
क्षीराम्बुधिनिवासस्त्वं चक्रपाण जनार्दन ।
व्रतेनानेन देवेश भुक्तिमुक्तिप्रदो भव ॥’
अशी प्रार्थना करावी. त्यानंतर तिथि संपण्याच्या वेळीं पारणें करावें. चतुर्दशी जर तीन प्रहरांहून अधिक असेल, तर पूर्वाह्नकाळीं पारणें करावें. चतुर्दशी जर तीन प्रहरांहून अधिक असेल, तर पूर्वाह्नकाळीं पारणें करावें. पौर्णिमेला जर शिजविलेल्या अन्नासहित उदकुंभदान केलें, तर गोदानफळ मिळतें. सोनें व तीळ घातलेल्या बारा उदकुंभांचें जर दान केलें, तर ब्रह्महत्येचें पातक नष्ट होतें. या दिवशीं कृष्णाजिनाचें (काळ्या पाठीच्या हरणाच्या कातडयाचें) जर यथाविधि दान केलें, तर पृथ्वीदानाचें फळ मिळतें. सोनें, मध, तीळ व तूप-यांसह जर कृष्णाजिनाचें दान केलें, तर सर्व पापांचा नाश होतो. या दिवशीं तिलस्नान, तिलहोम, तिलपात्रदान, तिळाच्या तेलाच्या दिव्याचें दान, तिळांनीं पितृतर्पण व मधासह तिलदान-हीं केलीं असतां, मोठें फळ मिळतें. तिळांच्या दानाचा मंत्र---
’तिला वै सोमदैवत्याः सुरैः सृष्टास्तु गोसवे ।
स्वर्गप्रदाः स्वतंत्राश्च ते मां रक्षन्तु नित्यशः’ ।
वैशाख शुद्ध द्वादशीला अथवा पुनवेला, वैशाखस्नानाचें उद्यापन करावें. एकादशी अथवा पुनव या दिवशीं उपास करुन, कलशावर सोन्याची प्रतिमा मांडावी व लक्ष्मीसह विष्णूची पूजा करावी. रात्रीं जागरण करुन, सकाळीं ग्रहांची पूजा करावी. नंतर खीर किंवा तीळ व तूप यांचा ’प्रतद्विष्णू०’ अथवा ’इदं विष्णु०’ या मंत्रानें १०८ होम करावा. होमाची सांगता व्हावी म्हणून गोदान, पादुका, जोडा, छत्री, पंखा, उदकुंभ, अंथरुण वगैरे दानें द्यावींत. इतकें करण्यास जर अशक्यता असेल, तर तिलमिश्रित अन्नाचें दहा ब्राह्मणांना भोजन घालावें. वैशाखी पुनवेपासून आरंभ करुन, ज्येष्ठ शुद्ध एकादशीपर्यंत विष्णूला पाण्यांत ठेवून, त्याचा पूजोत्सव करावा. वैशाखी अमावास्येला भावुका असें नांव आहे व तिच्या पुढच्या दिवसाला करि म्हणतात. हे दोन्ही दिवस शुभकार्याला वर्ज्य आहेत. याप्रमाणें काशीनाथोपाध्यायांनीं रचलेल्या धर्मसिंधुसारापैकीं वैशाख महिन्यांतल्या कृत्यांचा उद्देश येथें संपला.