देवा, माधवा मी या तीर्थाच्या पाण्याने सर्व माघ महिनाभर स्नान करीन, असा संकल्प करून कोणचे तरी एखादे तीर्थाचे ठिकाण मनात ठरवावे आणि
'दुःखदारिद्यनाशाय श्रीविष्णोस्तोषणायच ।
प्रार्तःस्नानं करोभ्यद्य माघे पापविनाशनम् ॥
मकरस्थे रवौ माघे गोविन्दाच्युतमाधव ।
स्नानेनानेन मे देव यथोक्त फलदो भव ॥
हे श्लोक म्हणून कोणाशी न बोलता स्नान करावे. रोज स्नान केल्यावर सूर्याला जे अर्घ्य द्यावे त्याचा मंत्र
'सवित्रे प्रसवित्रेच परंधाम जले मम ।
त्वत्तेजसा परिभ्रष्टं पापं यातु सहस्त्रधा ॥'
यानंतर संध्यापितृतर्पणादि करून, माधवाची पूजा करावी. जमिनीवर निजणे, तिलमिश्रित तुपाचे हवन, हविष्यभक्षण आणि ब्रह्मचर्य या गोष्टी माघ महिन्यात मोठ्या फलदायक आहेत. तद्वतच इन्धन (सर्पण), लोकरीचे वस्त्र, उपानह (जोडा वगैरे), तेल तूप, गादी, लेप, सोने व अन्न यांची दाने मोठी फल देणारी आहेत. स्नानाच्या आधी किंवा नंतर विस्तवाजवळ बसू नये. फक्त होमापुरतेच अग्नीपाशी बसावे; मनःशांतीकरिता बिलकूल बसू नये. रोज तीन हिस्से तीळ व एक हिस्सा साखर असे तिलाचे दान द्यावे. माघात अभ्यंग वर्ज्य करावा. उषःकाली स्नान करून, दंपत्याची पूजा करावी. माघात मुळा खाणे दारू पिण्याप्रमाणे असल्यामुळे तो खाऊ नये. पितर अथवा देव यांनाही मुळा अर्पण करू नये. माघमहिना जेव्हा अधिकाचा येतो तेव्हा, काम्य कर्माची समाप्ति करण्याचा निषेध असल्याने, दोन महिने स्नान करून त्या संबंधाचे नियम पाळावेत. एक महिनापर्यंत करावयाची जी चांद्रायणादि कर्मै, ती मलमासातच संपविण्याबद्दल सांगितलेले आहे. माघस्नान हे नित्य व काम्य असे दोन प्रकारचे आहे. सबंध महिनाभर स्नान करण्याची ज्याला शक्ति नसेल त्याने तीन दिवस किंवा निदान एक दिवस तरी ते करावे. हे स्नान पहिले तीन दिवसच करावे असे जरी काही ग्रंथकार सांगतात, तरी पण त्रयोदशीपासून तीन दिवस करावे असे अनेक ग्रंथकारांनी सांगितले आहे. पौषी पुनवेनंतरच्या सप्तमी, अष्टमी व नवमी या तिथींवर जी अष्टकाश्राद्धे करावयाची त्याबद्दल मागे सांगितलेच आहे. पौषी अमावास्येला अर्धोदययोग असतो.' पौष व माघ या महिन्यातल्या अमावास्या जर रविवार, व्यतिपात व श्रवण नक्षत्र यांनी युक्त असल्या, तर तोच अर्धोदययोग जाणावा. हा योग कोटिसूर्यग्रहणांसमान आहे. यापैकी काही योग जर कमि असला, तर महोदययोग होतो, असाही या श्लोकाचा चौथा पाद आहे असे कोणी सांगतात. पौष व माघ यांच्या मधली पुनव, अमान्तमासांतली पौषी अमावास्या व पुनवेनंतरची अमावास्या वगैरे तर्हेचा वरच्या श्लोकातल्या अमावास्येचा जरी अर्थ करतात, तरी पौषी पुनवेनंतरची अमावास्या असाच त्याचा अर्थ सर्वस्वी समजावा. हा योग दिवसासच प्रशस्त असून, रात्री अप्रशस्त होय. अर्धोदययोगांत सर्व जले गंगेप्रमाणे असून सर्व ब्राह्मण पवित्र व ब्रह्मदेवाप्रमाणे असतात, आणि कोणचेही केलेले दान मेरुपर्वताप्रमाणे मोठे होते.