प्रयागाला सर्वांनी (स्त्रीपुरुषांनी) वपन (मुंडन) करावे. पुरुषाने दहा महिन्यानंतर जर तीर्थाला जाणे केले तर, प्रायश्चित्तासाठी म्हणून पुन्हा क्षौर करावे. प्रयागाला बारा कोसांवरून येणारा जर दहा महिन्यांच्या आत पुन्हा आला, तर त्याने क्षौर करावे. यात्रा जर पहिलीच असेल तर ज्याचा बाप जिवंत आहे अशाने, गर्भार बाईने, चौलकर्म झालेल्या बालकाने व नवरा असलेल्या स्त्रीनेही (प्रयागास) वपन, करावे, हा (प्रयागतीर्थाचा) विशेष आहे. नवरा असलेल्या बायकांनी केसांची शेवटची दोन बोटे अग्रे कापावीत असे जे म्हणतात, त्याचा प्रयोग येणेप्रमाणे- वेणी घालून मंगलवेष धारण केलेल्या स्त्रियेने, नवर्याला नमस्कार करून, त्याने जर आज्ञा दिली तर सर्व केशांचे वपन किंवा केशाग्रांचे दोन बोटे छेदन करावे (नवर्याची आज्ञा नसल्यास काहीच करू नये. सध्या केशच्छेदन नवर्याकडूनच करण्याचा संप्रदाय आहे. ) नंतर स्नान करून, त्रिवेणीपूजा स्वतः करावी, किंवा नवर्याकडून करवावी. पूजा झाल्यावर (केशच्छेदन करवून घेतलेल्या स्त्रीने) आपली छिन्न झालेली वेणी बांबूच्या भांड्यात घालून, ते भांडे आपल्या ओंजळीत धरावे, व त्यात सोन्याची वेणी, मोती वगैरे ठेवून,
'वेण्यां वेणिप्रदानेन मम पापं व्यपोहतु । जन्मान्तरेष्वपि सदा सौभाग्यं मम वर्धताम् ॥
असा मंत्र म्हणून, ते भांडे त्रिवेणीत (गंगा, यमुना व सरस्वती यांच्या संगमात) टाकावे. नंतर ब्राह्मणांनी
'सुमङ्गलीरियं वधूः' हा मंत्र म्हटल्यावर सुवासिनी व ब्राह्मण यांना वस्त्रे वगैरे देऊन त्यांचा संतोष करावा.