चैत्र शुद्ध तृतीयेला अपराह्नकाळीं मत्स्यावतार झाला असल्यानें त्या दिवशीं मत्स्यजयन्ती, वैशाखी पुनवेला संध्याकाळीं कूर्मजयन्ती, भाद्रपद शुद्ध तृतीयेला अपराह्वकाळीं वराहजयन्ती, वैशाख शुद्ध चतुर्दशीला संध्याकाळीं नरसिंहजयन्ती, भाद्रपद शुद्ध द्वादशीला मध्याहकाळीं वामनजयन्ती, वैशाखशुद्ध तृतीयेला मध्याह्नकाळीं (प्रदोषसमयीं असें बरेच म्हणतात) परशुरामजयन्ती, चैत्र शुद्ध नवमीला मध्यान्हकाळीं दाशरथीरामजयन्ती, श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्रीं कृष्णजयन्ती, आश्विनशुद्ध दशमीला सायंकाळीं बुद्धजयन्ती, आणि श्रावणशुद्ध षष्ठीला सायंकाळीं कल्कीजयन्ती, या सर्व तिथी त्या त्या काळीं ज्या व्याप्त असतील त्या त्या घ्याव्या. यांत-मत्स्य, कूर्म, वराह, बुध व कल्की-या अवतारांविषयीं, आषाढादिक दुसरे महिने, दुसर्या तिथी, प्रातःकाळ वगैरेंच्या बाबतींत जीं वेगळालीं वचनें आहेत, त्यांची व्यवस्था कल्पादि भेदांवरुन करायची. ज्या उपासकांनीं जो पक्ष स्वीकारला असेल, त्या त्या दिवशीं उपास करावेत. मध्याह्नकालव्यापिनी अशा चैत्रशुद्धचतुर्थीस लाडू वगैरेंनीं श्रीगणेशाची पूजा करुन, दवणा वाहावा. त्यानें विघ्नांचा नाश होऊन, सर्व इच्छित गोष्टी प्राप्त होतात. चैत्रशुद्ध पंचमीला अनंतादि नागांची पूजा करुन, त्यांना दूध व तूप यांचा नैवेद्य अर्पण करावा. याच पंचमीला लक्ष्मीचें पूजन करावें. उच्चैःश्रवा वगैरेंचें पूजारुप हयव्रत याच पंचमीला करावें. या सर्व व्रतांना लागणारी जी पंचमी तिच्यासंबंधानें जो सामान्य निर्णय सांगितला आहे, त्याच निर्णयाची ती घ्यावी. याप्रमाणेंच पुढेंहि समजावें. ज्या ठिकाणीं विशेष निर्णय सांगितला नाहीं, अशा स्थळीं पहिल्या परिच्छेदांत सांगितलेलाच निर्णय ग्राह्य समजावा. षष्ठीला कार्तिकस्वामीला, सप्तमीला सूर्याला, नवमीला देवीला व पौर्णिमेला सर्व देवांना दवणा वहावा अशाबद्दलची ग्रंथांतरीं विस्तृत माहिती आहे. चैत्रशुद्ध अष्टमीला भवानीचा अवतार झाला असल्यानें, त्या बाबतींत जी अष्टमी घेणें ती नवमीयुक्त असणारी घ्यावी. या अष्टमीला पुनर्वसुनक्षत्र असेल, तर अशोकाच्या झाडाच्या आठ कळ्या खाव्या व त्या खातांना पुढील मंत्र म्हणावा.
’त्वमशोक नराभिष्ट मधुमासमुद्भव ।
पिबामि शोकसंतप्तो मामशोकं सदाकुरु’
या चैत्रशुद्ध अष्टमीला जर पुनर्वसु नक्षत्र आणि बुधवार असतील, तर त्या दिवशीं सकाळीं विधियुक्त स्नान केलें असतां वाजपेययज्ञाचें फळ मिळतें. चैत्रशुद्ध नवमी ही रामनवमी होय. चैत्रशुद्ध नवमी पुनर्वसु नक्षत्र असतां, मध्याह्नीं कर्कलग्न मेषस्थ सूर्य वगैरे पांच ग्रह उच्च असतां श्रीरामाचा जन्म झाला, असा इतिहास आहे. ही नवमी मध्याह्नव्यापिनी असतां उपास करावा. आदल्या दिवशीं जर मध्याह्नव्याप्ति असेल तर तीच नवमी घ्यावी. दोन्ही दिवशीं मधयन्हव्याप्ति असेल अथवा दोन्ही दिवशीं नसेल, तर दुसरीच घ्यावी; कारण, अष्टमीनें विद्ध झालेली नवमी घेऊं नये असा निषेध सांगितला आहे. अर्थात् यावरुन पहिल्या दिवशीं पूर्ण मध्यान्हव्याप्ति असून, दुसर्या दिवशीं जरी एकदेशव्याप्ति असली, तरी दुसर्याच दिवसाची घ्यावी हें उघड होतें. कांहीं ग्रंथकारांचें असें म्हणणें आहे कीं, मध्यान्हव्यापिनी व पुनर्वसुनक्षत्रानें युक्त अशी जर अष्टमी विद्धा असेल, तर ती टाकून, दुसर्या दिवशीं जर तीन मुहूर्तपर्यंत नवमी असेल, तर तीच सर्वांनीं उपासाला घ्यावी. दशमीचा क्षय असल्यानें जर स्मार्तांची एकादशी पारण्याला येईल, तर त्यांनीं अष्टमीविद्ध नवमी उपासाला घ्यावी. वैष्णवांनीं तीन मुहूर्तांनीं युक्त अशी दुसर्या दिवसाची घ्यावी. शुद्ध नवमीचा जर लाभ होत नसेल, तर सर्वांनींच अष्टमीविद्ध नवमी उपासाला घ्यावी असें म्हणतात. हें नवमीचें व्रत नित्य व काम्य असें दोन प्रकारचें आहे.