कन्यासंक्रांतीच्या पुढल्या सोला घटका पुण्यकाळ. भाद्रपदत दिवसातून एकदाच जेवण्याचे व्रत करावे. म्हणजे धन, आरोग्य वगैरे फळ मिळते. ह्रषीकेशाने संतुष्ट व्हावे म्हणून या महिन्यात पायस (खीर) गुळभात, मीठ वगैरेची दाने द्यावीत. भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका व्रत करावे. या व्रताला जी तृतीया घेणे ती दुसर्या दिवशी दोन घटका अथवा त्याहूनही जरी कमी असली तरी दुसर्या दिवसाची घ्यावी. जेव्हा क्षयामुळे दुसर्या दिवश नसेल तेव्हा द्वितीयायुक्त अशी पहिल्या दिवसाची घ्यावी. शुद्धाधिका म्हणजे वृद्धियुक्त असेल तेव्हा पूर्वदिवसाची जरी साठ घटका असली, तरी ती टाकून, दुसर्या दिवसची थोडी असली तरी ती घ्यावी; कारण, चतुर्थीचा योग उत्तम होय. या व्रतात बायकांनी शिव आणि भवानी यांची पूजा करून, उपास करावा. हे व्रत स्त्रियांना नित्य आहे.
'मन्दारमालांकुलितालकायै कपालमालांकितशेखराय । दिव्यांबरायैच दिगंबराय नमः शिवायै च नमः शिवाय ॥'
वगैरे पूजामंत्र म्हणावेत.